नालेसफाई कामात आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली, पालिकेची कंत्राटदाराला नोटीस

bmc send Notice to Contractor Delay in cleaning work
नालेसफाई कामात आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली, पालिकेची कंत्राटदाराला नोटीस

पावसाळा तोंडावर आलेला असताना नालेसफाईची कामे युद्धपातळीवर वेळेत पूर्ण करण्याचे आदेश पालिका आयुक्त यांनी नालेसफाई कामांची पाहणी करतना कंत्राटदारांना दिले होते. मात्र हे आदेश न जुमानता नालेसफाई कामात दिरंगाई करणाऱ्या एका कंत्राटदाराला पालिकेने नोटीस बजावली आहे. तसेच, ७ दिवसांत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत.

पालिकेने केलेल्या या कडक कारवाईमुळे नालेसफाईची कामे करणाऱ्या कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहेत. पावसाळा तोंडावर आलेला अस्तना मुंबईत नालेसफाईच्या कामांना ११ एप्रिलपासून म्हणजे १५ दिवस उशिराने सुरुवात करण्यात आली. मोठ्या नाल्यातील गाळ काढण्यासाठी ७ कंत्राटदार व छोट्या नाल्यातील गाळ काढण्यासाठी २४ वॉर्डात २४ कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई महापालिका यंदा नालेसफाई कामांवर १६२ कोटी रुपये तर सखल भागात साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिकेने यंदा ४०० छोटया पंपांची व्यवस्था केली आहे. गतवर्षीपेक्षाही ५० पंप अधिक वाढवले आहेत.

मात्र नालेसफाईच्या कामांना उशीर झाल्याने नियोजित वेळेत म्हणजे ३१ मे पूर्वी नालेसफाईची कामे पूर्ण करण्यासाठी पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी, यंत्रणा दुप्पट करून दोन अथवा तीन शिफ्टमध्ये काम करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला व कंत्राटदारांना दिले होते. मात्र कंत्राटदार ‘भूमिका’ याने त्याला देण्यात आलेल्या शहर भागातील वडाळा, वरळी, दादर माहिम, धारावी या भागातील नालेसफाईच्या कामांत दिरंगाई केल्याने शहर भागातील नालेसफाई ३५ टक्केही पूर्ण न केल्याने त्याला पालिकेने नोटीस बजावली आहे. नोटीस मिळाल्यापासून ७ दिवसांत त्याने स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबईत ५०.३० टक्के नालेसफाई

मुंबईत आतापर्यंत शहर भागात २८.९५ टक्के नालेसफाई झाली असून १३,०८९ मे.टन इतका गाळ काढण्यात आला आहे. पूर्व उपनगर भागात ५८.३६ टक्के नालेसफाई झाली असून ६४,०६६ मे.टन इतका गाळ काढण्यात आला आहे. तर पश्चिम उपनगर भागात ५०.७३ टक्के नालेसफाई झाली असून ९७,७२५ मे.टन इतका गाळ काढण्यात आला आहे. मुंबईत एकूण ५०.३० टक्के इतकी नालेसफाई झाली असून १,७४,८८२ मे.टन इतका गाळ काढण्यात आला आहे.


हेही वाचा : कुर्ला, वडाळा, घाटकोपरमध्ये २४ तास पाणी बंद, दादरलगत शहरांत कमी दाबाने पाणी