महापालिका मुख्यालयातील पक्ष कार्यालयावरील शिवसेना नावही हटविले

मारुती मोरे

मुंबई: मुंबईत जी -२० च्या २३ ते २५ मे या कालावधीत आयोजित बैठका व पालिका भेटीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने भाजपसह इतर सर्व राजकीय पक्षांच्या कार्यालयांवरील पक्षांचे नाव व फलक जसेच्या तसे ठेवत फक्त शिवसेना पक्ष कार्यालयावरील ‘शिवसेना’ पक्षाचा नामफलक तातडीने हटवला आहे. त्यामुळे पालिकेत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

शिवसेना पक्ष कार्यालयावर दावे करणाऱ्या शिंदे व ठाकरे गटाला तेल, तूप व धुपाटने याप्रमाणे अगोदर पक्ष कार्यालय, नंतर बसायचे सोफे, बाकडे आणि आता नामफलकही गमवावे लागले आहे. विशेषतः सत्तेत नसलेल्या ठाकरे गटाला त्यांनी जरी दाद मागितली तरी पालिका प्रशासन त्यांना दाद देणार नाही. मात्र शिंदे गटाला राज्यात सत्तेत असूनही पक्ष कार्यालय व आता नामफलक यावरही ताबा मिळवता न आल्याने प्रशासनामुळे त्यांची नाचक्की होऊ शकते. त्यामुळे आता शिंदे गटाला शिवसेना पक्ष कार्यालय व त्यावरील नामफलक टिकविण्यासाठी आपल्या सत्तेचा पुरेपूर वापर करावा लागणार असून पालिका प्रशासनाला जाब विचारावा लागणार आहे. तरच शिवसेनेचा नामफलक पुन्हा एकदा पक्ष कार्यालयावर लागू शकतो.

(पालिका कार्यालयातील शिवसेनेचे संग्रहित छायाचित्र)

गतवर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करून व भाजपशी हातमिळवणी करून राजकीय भूकंप घडवला आणि मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवली. तेव्हापासून शिवसेनेत शिंदे व उद्धव ठाकरे गटबाजीला उधाण आले. मुंबई महापालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालय ताब्यात घेण्यावरून दोन्ही गटात गेल्या २८ डिसेंबर २०२२ रोजी मोठा राडा झाला व प्रकरण हाणामारीपर्यंत जाता जाता वाचले. त्यानंतर पालिका आयुक्त चहल यांनी पुढील राडा टाळण्यासाठी त्याच दिवशी सूर्यास्त होताच शिवसेनेसह सर्वच पक्ष कार्यालयांना नोटिस व सील ठोकले. त्यामुळे माजी महापौरांसह नगरसेवकांना सोफा, बाकड्यांवर बसावे लागत होते. नंतर ८ मार्च रोजी पालिका प्रशासनाने बसण्यासाठी ठेवलेले सर्वच बाकडे, सोफेही हटविल्याने माजी महापौरांसह, माजी गटनेते, माजी समिती अध्यक्ष व सर्वपक्षीय माजी नगरसेवकांना चक्क जमिनीवर बसावे लागले.

(भाजपसह अन्य पक्षांच्या कार्यालयाबाहेरील नामफलक जैसे थे ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, प्रकरण जैसे थे असताना पालिका प्रशासनाने मात्र जी -२० च्या २३ ते २५ मे २०२३ या कालावधीत आयोजित बैठक व पालिका भेटीच्या निमित्ताने शिवसेना पक्ष कार्यालयावरील ‘शिवसेना’ पक्ष कार्यालयावरील नामफलक अचानकपणे हटवले. मात्र दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा अगोदरचा राजकीय मित्र पक्ष व नंतर सत्तेवरून मतभेद झाल्याने शत्रू पक्ष बनलेल्या भाजपसह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षांच्या कार्यालयावरील त्या त्या पक्षांचे नामफलक ‘जैसे थे तैसे’ आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाच्या कार्यवाहीचा मोठा फटका शिवसेनेच्या ठाकरे व शिंदे या दोन्ही गटांना बसलेला आहे. मुंबई महापालिकेत गेल्या २५ वर्षांपासून सत्ता उपभोगणाऱ्या ठाकरे गटाच्या व शिंदे गटाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.