मंकीपॉक्स विषाणूबाबत मुंबई महापालिकेकडून अलर्ट जारी, कस्तुरबा रूग्णालयात २८ बेड्सचा स्वतंत्र वॉर्डही तयार

जगभरात मंकीपॉक्स (Monkeypox) विषाणूच्या रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. युरोपीय देशांमध्ये मंकीपॉक्स विषाणू धुमाकूळ घालत असल्यामुळे केंद्र सरकारने (Central Government) आता सर्वच राज्यांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य विभागाने मंकीपॉक्सच्या विषाणूबाबत मुंबई महापालिकेला (BMC) सावधतेचा इशारा दिला आहे. तसेच मुंबई महापालिकेने यासाठी तयारी सुरू केली असून कस्तुरबा रुग्णालयात (Kasturba Hospital) २८ बेड्सचा स्वतंत्र वॉर्डही तयार करण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या (Maharashtra public health department) माहितीनुसार, भायखळा स्थित कस्तुरबा हॉस्पिटल, एक संसर्गजन्य रुग्णालय, मुंबईत संशयित आणि पुष्टी झालेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र २८ खाटांचा वॉर्ड राखून ठेवण्यात आला आहे. २३ मे पर्यंत शहरात सध्यातरी कोणत्याही प्रकारचे संशयित रुग्ण आढळून आलेले नाहीयेत.

मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे सांगतात की, आम्ही मंकीपॉक्सच्या संशयित रुग्णांच्या आयसोलेशन आणि व्यवस्थापनासाठी तयारी सुरू केली आहे. विमानतळ प्राधिकरण स्थानिक आणि परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करत आहेत. कस्तुरबा रुग्णालयातील स्वतंत्र वॉर्ड राखीव ठेवण्यात आला असून त्यांचे नमुने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) पुणे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत.

मंकीपॉक्स हा विषाणू एका व्यक्तिकडून दुसऱ्या व्यक्तिकडे आणि प्राण्यांमधून सुद्धा व्यक्तिंमध्ये संक्रमित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंकीपॉक्स हा विषाणूजन्य झुनोटिक रोग आहे, जो प्रामुख्याने मध्य आणि पश्चिम आफ्रिकेतील उष्णकटिबंधीय रेनफॉरेस्ट भागात आढळतो आणि कधीकधी इतर प्रदेशांमध्ये आढळतो.

मंकीपॉक्स आजार नेमका आला कुठून?

युरोपियन (Europe) देशांमध्ये मंकीपॉक्सचा पहिला रूग्ण ७ मे रोजी समोर आला होता. ती व्यक्तिही नायजेरियातून आली होती. मंकीपॉक्सची सर्वाधिक प्रकरणे आफ्रिकन देशांमध्ये आढळून येत आहेत. २०१७ पासून याठिकाणी ही प्रकरणे वाढत आहेत. पण चिंताजनक म्हणजे आता या देशानंतर युरोपमध्येही मंकीपॉक्सचे रुग्ण आढळून येत आहेत.


हेही वाचा : युरोपमध्ये monkeypox आजाराचे थैमान, महामारी घोषित करण्यावरून वाद