घरताज्या घडामोडीभांडुप संकुलात जल शुद्धीकरण प्रक्रियेसाठी पालिकेचे पाऊल, १२ कोटींचा खर्च करणार

भांडुप संकुलात जल शुद्धीकरण प्रक्रियेसाठी पालिकेचे पाऊल, १२ कोटींचा खर्च करणार

Subscribe

मुंबईची तहान भागविणाऱ्या सात तलावांपैकी एक असलेल्या विहार तलावातून ‘ओव्हरफ्लो’ होणारे पाणी यापुढे पावसाळ्यात रोखण्यात येणार आहे. ते ‘ओव्हरफ्लो’ होणारे पाणी नजीकच्या भांडुप जल शुद्धीकरण केंद्रात वळविण्यात येणार आहे. तेथे त्यावर प्रक्रिया करून ते पाणी मुंबईकरांची जादा पाण्याची तहान भागविण्यासाठी वापरण्यात येणार आहे.

त्यासाठी पालिका तब्बल १२ कोटी रुपयांचा खर्च करून सदर काम दोन वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे मिठी नदीला पावसाळ्यात येणारा पूर नियंत्रणात येणार आहे. तसेच, मुंबईकरांना पिण्यासाठी जे जास्तीचे पाणी हवे आहे, त्याची काही प्रमाणात तरी उपलब्धता होणार आहे. असे दोन फायदे पालिकेच्या एका निर्णयामुळे होणार आहेत.

- Advertisement -

वास्तविक, मुंबईत २६ जुलै २००५ रोजी झालेल्या पुरपरिस्थितीला व त्यामुळे झालेल्या मोठ्या जिवीत हानीला त्या दिवशी झालेली अतिवृष्टी व दिवसभरात पडलेला विक्रमी ९४४ मिमी पाऊस कारणीभूत होताच. शिवाय, विहार तलावाचे ‘ओव्हरफ्लो’ झालेले पाणी हे मिठी नदीला जाऊन मिळत असल्याने नदीच्या पाण्याची पातळी वाढून पूरपरिस्थिती निर्माण होते.

दरवर्षी पावसाळ्यात तलावांत जमा होणारे पाणी हे मुंबईचे जलजीवन आहे. मात्र विहार तलावाची पाणी साठवण क्षमता मर्यादित असल्याने या तलावात जमा होणारे पाणी दरवर्षी ‘ओव्हरफ्लो’ होऊन ते मिठी नदीला जावून मिळते. नव्हे मिठी नदीचे मूळ स्त्रोतच या ‘ओव्हरफ्लो’ होणाऱ्या पाण्यात दडलेले आहे.

- Advertisement -

मात्र अनेक वर्षांनी महापालिकेला शहाणपण आले आहे. यावर जालीम तोडगा काढण्यात आलेला आहे. आता विहार तलावातील ‘ओव्हरफ्लो’ होणारे पाणी नजीकच्या भांडुप जल शुद्धीकरण केंद्रात वळवून त्यावर प्रक्रिया करून ते पाणी पिण्यासाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात मिठी नदीची पूरस्थिती नियंत्रणात राहणार असून मुंबईची जादा पाण्याची तहानही भागणार आहे. मुंबईकरांना पिण्यासाठी जास्तीचे पाणी काही प्रमाणात तरी उपलब्ध होणार आहे.

त्यासाठी लवकरच सल्लागार नेमून विहार तलावाजवळ एक पंपिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. त्याद्वारे ‘ओव्हरफ्लो’ होणारे पाणी जलवाहिन्यांद्वारे भांडूप जल शुद्धीकरण प्रकल्पाच्या ठिकाणी वहन करून आणण्यात येणार आहे. तेथे शुद्धीकरण प्रक्रिया करून सदर पाणी पिण्यासाठी वापरले जाणार आहे. तसेच, येत्या दोन वर्षात हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.


हेही वाचा : आमदार अपात्रतेच्या आधी निर्णय नको, उद्धव ठाकरेंचे निवडणूक आयोगाला आवाहन


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -