मुंबईतील नाले सफाईच्या कामाची होणार पोलखोल, साॅफ्टवेअर ठेवणार कामांवर लक्ष

नालेसफाईच्या कामात कंत्राटदार हात की सफाई करतात, नालेसफाई नीटपणे होत नाही असे आरोप राजकीय पक्ष, नागरिकांकडून केले जातात. त्याची गंभीर दखल घेऊन पालिकेने आता नालेसफाईच्या कामात पारदर्शकता राखणे व कंत्राटदाराच्या हात की सफाईला चाप लावण्यासाठी संगणक प्रणाली तंत्रज्ञांची नेमणूक करून एक सॉफ्टवेअर विकसित केले आहे. या आधुनिक यंत्रणेच्या मार्फत पालिका प्रशासन कंत्राटदारांच्या कामांवर बारीक नजर ठेवत असून या यंत्रणेच्या माध्यमातून बसल्या जागी नालेसफाई कामाची, गाळ कुठून किती काढला, कुठे व कधी नेला, त्याचे वजन किती याबाबतची सर्व माहिती फोटो, व्हिडीओद्वारे उपलब्ध होत आहे. त्यामुळे कंत्राटदाराला नालेसफाईच्या कामात कोणत्याही प्रकारची लपवाछपवी, भ्रष्टाचार करता येणार नाही, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

मुंबईत सध्या पावसाळ्यापूर्वी आवश्यक ७५ टक्के नालेसफाईची कामे सुरू आहेत. आता पर्यंत लहान – मोठ्या नाल्यामधून गाळ काढण्याचे काम ४५ टक्के पूर्ण झाले आहे. तर मिठी नदीमधून आतापर्यंत २ लाख मेट्रिक टन गाळ काढण्यात आलेला आहे. या नालेसफाईच्या कामांना उशिराने सुरुवात झालेली असली तरी ही नालेसफाईची कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्यात येतील, असा दावा महापालिका उपायुक्त उल्हास महाले, विभास आचरेकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. मात्र मुंबईची भौगोलिक स्थिती पाहता व समुद्राला मोठी भरती असेल आणि त्याचवेळी अतिवृष्टी झाल्यास यंदाच्या पावसाळ्यात पाणी साचणार नाही, याबाबत कोणतेही खात्रीलायक आश्वासन देता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

मुंबईतील नद्या, नाल्यांमधील सफाईबाबत

मुंबईत मिठी, वालभट, पोयसर, दहिसर ओशिवरा ५ नद्या आहेत. या नद्यांमध्ये किनाऱ्यालगत असलेल्या झोपडपट्टी, इमारती, सोसायट्या, गोदामे, लहान कारखाने, उद्योगधंदे यांमधील सांडपाणी, रासायनिक पाणी थेट सोडले जाते. तर मिठी नदीचा उगम स्थान हा विहार तलाव येथून ओव्हरफ्लो होणारे पाण्याच्या माध्यमातून होतो. त्यामध्ये झोपडपट्टीतील नाल्यांचे सांडपाणी मिसळले जाते. मात्र अतिवृष्टी झाल्यास मिठी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते. मात्र नदीने धोक्याची पातळी ओलांडली तर पूरस्थिती निर्माण होते. त्यामुळे पालिका लहान – मोठ्या नाल्यांसोबतच मिठी नदी व अन्य नद्यांचीही साफसफाई करते.

मुंबईत एकत्रित ३०९ मोठे नाले आहेत. त्‍यांची लांबी साधारणतः २९० किलोमीटर आहे. तसेच मुंबईत ५०८ छोटे नाले असून त्यांची लांबी ६०५ किलोमीटर आहे. त्याव्यतिरिक्त महापालिका क्षेत्रात रस्‍त्‍यालगत गटारे असून त्यांची लांबी जवळपास २,००४ किलोमीटर आहे. नदी नाल्यांमधून साचलेला गाळ हा दरवर्षी पावसाळ्यापूर्वी काढून क्षेपणभूमीवर वाहून नेला जातो. मोठ्या नाल्यातून जवळपास ४ लाख ६३ हजार मेट्रिक टन तसेच छोटे नाले व पावसाळी गटारे यातून ४ लाख २४ हजार मेट्रिक टन एवढा गाळ काढला जातो. एकूणच जवळपास ८ लाख ८८ हजार मेट्रिक टन गाळ हा मुंबईबाहेर नेण्यात येतो. या एकूण गाळापैकी ७५ टक्के गाळ हा पावसाळ्यापूर्वी काढण्यासाठी महापालिका कटिबद्ध असते, असे उपायुक्त महाले यांनी सांगितले.

मुंबईकरांना एका क्लिकवर घरबसल्या मिळणार नालेसफाईच्या कामांची माहिती

मुंबईत सध्या नालेसफाईची कामे सुरू आहेत. मात्र नालेसफाई किती प्रमाणात झाली, किती प्रमाणात गाळ काढला, गाळ कुठे टाकला, नाले व नद्या आदींबाबतची माहिती सर्वसामान्यांना मुंबईकरांना आता एका क्लिकवर मोबाईल, संगणक यांवर उपलब्ध होणार आहे.

नालेसफाई कामांची अचूक माहिती देण्यासाठी एक सॉफ्टवेअरचा वापर करून त्याद्वारे एक “डॅशबोर्ड’ निर्माण केला आहे. त्या सॉफ्टवेअरची लिंक मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळावर मिळणार आहे. https://swd.mcgm.gov.in/wms2022 या नावाने देण्यात आली आहे. ही लिंक वापरुन प्रत्येक नागरिकाला आपल्या विभागामधील नाल्याची गाळ काढून स्वच्छता कशी केली जाते, ते सहजपणे मोबाईलद्वारे देखील पाहता येणार आहे. ही सुविधा शुक्रवारपासून नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.


हेही वाचा : Ravi Rana: एका महिलेशी केलेले गैरवर्तन राज्याने पाहिले, रवी राणांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा