तारकर्लीत पर्यटकांनी भरलेली बोट समुद्रात बुडाली, दोघांचा मृत्यू

सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील तारकर्लीमध्ये (Tarkarli) पर्यटकांनी (Tourist) भरलेली बोट समुद्रात बुडाली आहे. जय गजानन नावाची ही बोट असून, या बोटीत 20 पर्यटक असल्याची माहिती मिळते. बोट बुडाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी बचावकार्याकरीता यंत्रणा तैनात करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, या 20 जणांपैकी 16 जणांचा जीव वाचवण्यात यश आले आहे. मात्र दोघांचा नाकातोंडात पाणी जाऊन मृत्यू झाला असून, अन्य दोन पर्यटक गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, त्यांच्यावर मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जखमींना मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले
जखमींना मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले

हेही वाचा – मुंबईजवळील समुद्रात बोट बुडाली; ६ जणांनी वाचवले स्वत:चे प्राण

नेमके काय घडले –

आकाश देशमुख आणि स्वप्नील पिसे अशी मृत पर्यटकांची नावे आहेत. आकाश हा अकोलामध्ये राहणारा रहिवाशी आहे, तर स्वप्निल हा पुण्याचा रहिवाशी आहे.  तसेच रश्मी निशेल कासुल (४५ रा. ऐरोली, नवी मुंबई) यांच्यावर रेडकर हॉस्पीलट येथे तर संतोष यशवंतराव (३८ बोरिवली, मुंबई), डॉ. अविनाश झांटये हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत.

तसेच गंभीर जखमी असलेल्या दोघा जणांची नावे समजली नसून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. मंगळवारी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास तारकर्ली (Tarkarli) समुद्रात स्कुबा डायव्हिग करुन परतत असताना बोट समुद्रा बुडाल्याची घटना घडली. या अपघातातील सर्व पर्यटक पुणे आणि मुंबई येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे.

हेही वाचा – उत्तनजवळ समुद्रात बोट बुडाली

बोट नेमकी कोणत्या कारणामुळे बुडाली याची माहिती मिळू शकलेली नाही. याप्रकरणी स्थानिक प्रशासनाकडून या दुर्घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. तसेच, बोट चालक आणि मालकावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या बोटीची प्रवाशी क्षमता किती होती आणि दुर्घटना घडली तेव्हा पर्यटकांना लाईफ जॅकेटस देण्यात आली होती का, याचा सध्या तपास केला जात असल्याची माहिती मिळते.

सद्यःस्थितीत बोटीतील सर्व पर्यटक सापडले आहेत, अशी माहिती पोलीस पाटील देवबाग यांनी दिली आहे. दरम्यान, उन्हाळ्याची सुट्टी असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक (Tourist) मालवणमध्ये फिरायला येत असतात. समुद्री खेळांसाठी प्रसिद्ध असलेल्या तारकर्लीत अनेक पर्यटक स्कुबा डायव्हिंगसाठी येतात. स्कुबा डायव्हिंगसाठी तारकर्लीला पहिली पसंती मिळत आहे.


हेही वाचा – राज्यसभेसाठी शिवसेनेकडून संजय पवारांना उमेदवारी, मुख्यमंत्र्यांकडून लवकरच अधिकृत घोषणा – संजय राऊत