घरCORONA UPDATECoronavirus: धक्कादायक; कोरोना विरोधातील लढ्यात बोगस डॉक्टरांची एंट्री

Coronavirus: धक्कादायक; कोरोना विरोधातील लढ्यात बोगस डॉक्टरांची एंट्री

Subscribe

कोरोनाविरोधातील लढ्यात आयुष अंतर्गत येणाऱ्या आयुर्वेद आणि युनानी डॉक्टरांची गरज लक्षात घेऊन त्यांना महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनद्वारे (एमसीआयएम) ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले. मात्र, नोंदणीकृत डॉक्टरांसाठी असलेल्या या प्रशिक्षणात राज्यातील बोगस डॉक्टरांनी मोठ्या प्रमाणात वर्णी लावत प्रशिक्षणाचे ऑनलाईन प्रमाणपत्र मिळवल्याचे उघडकीस आले आहे. बोगस डॉक्टरांनी ‘कोविड १९’ चे हे ऑनलाईन प्रमाणपत्र त्यांच्या क्लिनिकमध्ये लावल्यास सर्वसामान्य नागरिक त्यांना अधिकृत डॉक्टर समजतील. त्याचा फायदा घेऊन हे बोगस डॉक्टर आपला गोरस धंदा अधिक तेजीत चालवण्याची शक्यता आहे. सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ करण्यासाठी या डॉक्टरांना परिषदेकडूनच परवानगी मिळाल्याने एमसीआयएमच्या अध्यक्षांसह रजिस्टारवर कारवाई करण्याची मागणी वैद्यकीय क्षेत्रातून होत आहे.

महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी अधिनियम १९६१ अन्वये महाराष्ट्र शासनाने आयुर्वेद आणि युनानी डॉक्टरांची नोंदणी आणि नियमनाचे कार्य करण्यासाठी महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन या परिषदेची स्थापन केली आहे. देशात वेगाने वाढत असलेला कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून भविष्यात या परिषदेमधील नोंदणीकृत आयुर्वेद आणि युनानी डॉक्टरांचे सहकार्य घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे एमसीआयएमने त्यांच्या नोंदणीकृत डॉक्टर आणि आंतरवासिता प्रशिक्षणार्थींनीसाठी http://www.mcimtraining.com या संकेतस्थळामार्फत ९ ते ११ एप्रिलदरम्यान ऑनलाईन प्रशिक्षण व परीक्षा देण्याची योजना आखली होती. त्यानुसार ६० हजारपेक्षा अधिक जणांनी प्रशिक्षणानंतर परीक्षा देऊन परिषदेचे प्रमाणपत्र मिळवले. या ऑनलाईन प्रशिक्षणास १६ व १७ एप्रिलला असे दोन दिवस मुदतवाढ देण्यात आली होती.

- Advertisement -

 

मात्र फक्त परिषदेच्या नोंदणीकृत डॉक्टरांसाठी ऑनलाईन प्रशिक्षणासह असलेली परीक्षा नोंदणीकृत डॉक्टरांसह परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, समाजसेवक आणि बोगस डॉक्टरानीही दिली. या परीक्षेत त्यांनी ५० पेक्षा अधिक गुण मिळवत परिषदेकडून देण्यात येणारे ‘कोव्हीड १९’ चे प्रमाणपत्रही मिळवले. मात्र यातही एकाच नोंदणी क्रमांकावर दोन वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावाने प्रमाणपत्र देण्यात आली आहेत. परिषदेकडून दिलेल्या प्रमाणपत्रांवर त्या व्यक्तीच्या नावासमोर ‘डॉक्टर’ अशी पदवी लिहिण्यात आली आहे. या प्रमाणपत्रांवर आयुषचे संचालक डॉ. कुलदीप राज कोहली, एमसीआयएमचे अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता आणि रजिस्टर डॉ. दिलीप वांगे यांची स्वाक्षरी आहे.

- Advertisement -

mcim manisha pandit

‘आपलं महानगर’च्या हाती आलेल्या पुराव्यानुसार एमसीआयएमच्या नोंदणीकृत डॉक्टर शालिनी भीमराव पाटील यांचा नोंदणी क्रमांक आय-१७५१६ असा आहे. डॉ. शालिनी पाटील यांनी परीक्षा दिल्याने त्याना प्रमाणपत्र ऑनलाईन जारी झाले. परंतु त्याच क्रमांकाने पुण्यातील मनीषा पंडित या परिचारिकेच्या नावानेही परिषदेच्या ऑनलाईन संकेतस्थळावरून प्रमाणपत्र जारी झाले आहे. पंडित यांच्याप्रमाणे अल्टरनेटिव्ह मेडिसिनच्या डॉक्टरांनाही परिषदेच्या नोंदणीकृत डॉक्टरांच्या नोंदणी क्रमांकाने प्रमाणपत्रे जारी झाले आहेत. या प्रमाणपत्रावर आयुषचे संचालक, एमसीआयएमचे अध्यक्ष आणि रजिस्टार यांची स्वाक्षरी असल्याने कोणीही सर्वसामान्य व्यक्ती संबंधित व्यक्तीच्या डॉक्टरकीवर अविश्वास दाखवू शकणार नाही. त्यामुळे बोगस डॉक्टर कोव्हीड १९ चे प्रमाणपत्र आपल्या क्लिनिकमध्ये लावून नागरिकांचा विश्वास संपादन करून त्यांची आर्थिक लूट करण्याची शक्यता आहे. बोगस डॉक्टरांना मिळालेले हे प्रमाणपत्र म्हणजे सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ खेळण्याचा प्रकार असून परिषदेच्या या भोंगळ कारभाराची कारवाई करण्यात यावी अशी मागणी वैद्यकीय क्षेत्रातून करण्यात येत आहे.

micm shalini patil

ऑनलाईन प्रशिक्षणानंतर घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा केवळ परिषदेच्या नोंदणीकृत डॉक्टरांसाठी बंधनकारक होत. असे असताना अन्य व्यक्तींना नोंदणी करून परीक्षा कशी देता आली. तसेच परिषदेकडून देण्यात आलेल्या प्रमाणपत्रावर डॉक्टर उल्लेख असल्याने त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. या भोंगळ कारभाराला परिषदेचे अध्यक्ष आणि रजिस्टार जबाबदार असल्याने त्यांच्यावर सरकारकडून कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. – डॉ. पवन सोनवणे, केंद्रीय समन्वयक, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा)

 

लॉकडाऊन दरम्यान मनुष्यबळ व आयटी तज्ञ उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे जे उपलब्ध झंझाले त्यांच्या माध्यमातून ऑनलाईन प्रशिक्षण व परिषदेसाठी स्वतंत्र पोर्टल सुरु करण्यात आले. मात्र त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. मात्र प्रशिक्षणाची मुदत वाढवल्यानंतर त्यामध्ये सुधारणा करण्यात आल्या. – डॉ. आशुतोष गुप्ता, अध्यक्ष, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.

एक प्रतिक्रिया

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -