साई रिसॉर्ट प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाकडून अनिल परब यांना दिलासा

साई रिसॉर्ट प्रकरणात सदानंद कदम यांना अटक झाल्यानंतर ठाकरे गटाचे अनिल परब यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाकडून अनिल परब यांना दिलासा देण्यात आला आहे.

Bombay High Court gives relief to Anil Parab in Sai Resort case

दापोली येथे असलेल्या साई रिसॉर्ट प्रकरणी दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे (शिंदे गट) रामदास कदम यांचे भाऊ आणि अनिल ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात अनिल परब यांचे देखील नाव घेण्यातआले आहे. त्यामुळे परब यांच्यावर अटकेची टांगती तलावार होती. पण त्याआधीच अनिल परब यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी आज (ता. १४ मार्च) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली असून न्यायालयाकडून ईडीला महत्वाचे निर्देश देण्यात आले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाने अनिल परब यांना या प्रकरणी दिलासा देत सोमवारपर्यंत म्हणजेच २० मार्चपर्यंत अनिल परब यांना अटक करू नये, असे आदेश दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे पुढील काही दिवसांसाठी का असेना पण परब यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच या प्रकरणात काही तासांपूर्वी जयराम देशपांडे यांना सुद्धा अटक करण्यात आली आहे.

भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या हे साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांच्या मागे हात धुवून लागले आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. किरीट सोमय्या यांनी याप्रकरणात अनिल परब यांच्याविरोधात अनेक पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केलेल्या आहेत. ज्यामुळे परब यांची चौकशी सुद्धा करण्यात आलेली आहे. परब यांनी दापोलीत असलेल्या या साई रिसॉर्टचे बांधकाम हे बेकायदेशीररीत्या केले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आला आहे आणि कधी ना कधी याप्रकरणात अनिल परब यांना सुद्धा अटक करण्यात येईल, अशी भविष्यवाणी सुद्धा सोमय्या यांच्याकडून करण्यात आलेली आहे.

काय आहे प्रकरण?
दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अनिल परबांवर शासनाचा महसूल बुडवून फसवणूक केल्याचा आरोप आहे. दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून सातत्याने अनिल परब यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात फसवणूक करत बनावट कागदपत्रांच्या आधारे एक रिसॉर्ट बांधल्याचा आरोप होत आहे. 2017 मध्ये अनिल परब यांनी या रिसॉर्टसाठी भूखंड विकत घेतला आणि कोरोनादरम्यान लॉकडाऊनच्या काळात या शेतीच्या भूखंडावर रिसॉर्ट बांधण्याचे काम केले.

मिळालेल्या माहितीनुसार, जमीन खरेदी केल्यानंतर दोन वर्षांनी 2019 मध्ये याची नोंदणी झाली आणि त्यानंतर 2020 मध्ये ही जमीन मुंबईतील केबल ऑपरेटर आणि शिवसेनेचे माजी खासदार रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना ही जमीन 1.10 कोटींना विकण्यात आली. दरम्यान किरीट सोमय्यांकडून हे रिसॉर्ट पाडण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्या मते रिसॉर्टच्या बांधकामातून पर्यावरण नियमांचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे परब यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा – अडीच महिन्यांपूर्वीचा ‘भ्रष्टाचारी’, आता झाला शिंदे गटाचे ‘भूषण’; सर्वांच्या भुवया उंचावल्या

या प्रकरणी ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) 26 मे रोजी अनिल परब यांच्या सात ठिकाणी छापेमारी केली. तसेच त्यांच्या साथीदारांच्या घरांवरही छापे टाकून चौकशी केली. दरम्यान परब यांनी जमीन खरेदीपासून ते बांधकामात अनियमितता केल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. मात्र परब यांनी या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगत सोमय्या यांच्यावर मानहानीचा दावाही दाखल केला आहे.