घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रउबेर कार बुक केली, चालकाला पाण्यातून दिले गुंगीचे औषध आणि कार घेऊन...

उबेर कार बुक केली, चालकाला पाण्यातून दिले गुंगीचे औषध आणि कार घेऊन झाले पसार

Subscribe

नाशिक : उबेर कॅबचालकाला पाण्याच्या बाटलीतून गुंगीचे औषध देवून कार, मोबाईल व रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सापळा रचून प्रवाशाला अटक केली आहे. शुभम ऊर्फ स्वदेश दीपक नागपूरे (वय २५, हल्ली रा. आसनगावं, रहाटी, जि. ठाणे, मूळ रा. साईदर्शन रो हाउस, श्री रामचंद्र नगर जवळ, दिंडोरी रोड, म्हसरूळ, नाशिक) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल प्रसाद शिवनंदन प्रसाद (वय २४, मूळ रा. झारखंड, हल्ली रा. ध्यान साधना कॉलेज जवळ, ठाणे) यांच्या ताब्यातील उबेर कंपनीच्या स्वीफ्ट कारमध्ये ६ मे २०२३ रोजी एक प्रवासी बसला. त्याने भाडे तत्वावर कार बुक करून मुंबईतून नाशिकला सोडण्यास सांगितले. त्यानुसार राहुल प्रसाद प्रवाशाला घेऊन नाशिकच्या दिशेने निघाले. दरम्यान, प्रवाशाने प्रसाद यांना नकळत पाण्यात गुंगीचे औषध दिले. ते पाणी पिल्याने प्रसाद यांना गुंगी आली. त्यानंतर प्रवाशाने प्रसाद यांच्या खिशातील पैशाचे पाकीट व मोबाईल घेऊन कारसह पळ काढला. याप्रकरणी प्रसाद यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार भद्रकाली पोलीस व नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकने समांतर तपास सुरु केला.

- Advertisement -

गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ व त्यांच्या पथकाने गुन्हा दाखल होताच घटनास्थळी भेट देत पाहणी केली. पथकाने आरोपी कोणत्या दिशेने गेला असावा, याचा शोध सुरु केला. पथकाने भद्रकालीतील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून मानवी कौशल्य व तांत्रिक माहितीच्या आधारे, पोलीस हवालदार सुरेश निवृत्ती माळोदे यांना संशयित आरोपीबाबत ठावठिकाणा समजला.

आरोपी नाशिकरोड बसस्थानकात येत असल्याची माहिती मिळताच पथकातील सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सहायक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागूल, पोलीस हवालदार सुरेश माळोदे, मुख्तार शेख यांनी सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पथकाने त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गुन्ह्यात चोरलेला प्रसाद यांचा मोबाईल मिळून आला. त्यास मोबाईलबाबत विचारपूस केली असता त्याने प्रसाद यांचा मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. शिवाय, त्याने प्रसाद यांना गुंगीचे औषध देवून मोबाईल चोरल्याची कबुली दिल्याने पथकाने त्यास ताब्यात घेवून गुन्हयाचे पुढील तपासकामी भद्रकाली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

- Advertisement -
असा अडकला आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

संशयित आरोपी शुभम नागपुरे हा वाहन खरेदी-विक्री व्यवसाय करतो. मात्र, त्याला तोटा झाला होता. तो ओएलएक्स व इंस्टाग्रामच्या माध्यमातून ग्राहकांशी संपर्क साधायचा. ही बाब पोलिसांना तपासात समजली होती. पोलिसांनी त्याच्याशी इंस्टाग्रामवर चॅटींग करत कार विक्रीसाठी नाशिकला बोलविले. तो नाशिकरोड बसस्थानकात येताच पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत तो नाशिकचा असल्याचे समोर आले आहे. तो कामधंद्याच्या शोधात मुंबईत गेला. तो मुंबईत वाहन खरेदी व विक्री करायचा. त्यासाठी तो ओएलएक्सची मदत घ्यायचा. त्याने कारचालकासह इतरांना लुटले आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत.

जीपीएस लोकेशवरून लागला कारचा शोध

कारचालक राहुल प्रसाद बेशुद्ध झाल्याने संशयित आरोपी शुभम नागपुरे याने चालकाचा मोबाईल व रोकडसह कार घेवून मुंबईच्या दिशेने पळून गेला होता. त्याने वाटेत कार सोडून मुंबईकडे गेला होता. चालक प्रसाद हे शुद्धीवर आल्यावर त्यांना कार, मोबाईल व खिशात पैसे दिसले नाही. प्रसाद यांनी कारला जीपीएस यंत्रणा बसविली होती. त्यावरून त्यांनी कारचा ठावठिकाणा शोधून काढला. कार उभी असलेल्या ठिकाणी ते गेले असता त्यांना फक्त कार दिसली पण कारमध्ये कोणीच नव्हते. कार मिळाल्यानंतर त्यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात मोबाईल चोरी झाल्याची फिर्याद दिली.

भद्रकाली पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल होताच गुन्हे शाखेने तपास सुरु केला. तपासात प्रवाशाने कार, मोबाईल व रोकड लंपास केल्याचे समोर आले आहे. त्यास पथकाने सापळा रचून नाशिकमध्ये अटक केली. : विजय ढमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट एक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -