घरताज्या घडामोडीधनुष्यबाण चिन्ह कुणाचे? ठाकरे-शिंदे गटासाठी आजचा दिवस महत्त्वाचा, निवडणूक आयोगासमोर सुनावणी

धनुष्यबाण चिन्ह कुणाचे? ठाकरे-शिंदे गटासाठी आजचा दिवस महत्त्वाचा, निवडणूक आयोगासमोर सुनावणी

Subscribe

शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाणाचे चिन्ह कुणाला मिळणार याबाबत आज केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. या सुनावणीदरम्यान ठाकरे गट व शिंदे गट लेखी म्हणणं मांडणार आहे.

शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाणाचे चिन्ह कुणाला मिळणार याबाबत आज केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. या सुनावणीदरम्यान ठाकरे गट व शिंदे गट लेखी म्हणणं मांडणार आहे. त्यामुळे आजच्या निवडणूक आयोगाच्या सुनावणीत निर्णय जाहीर होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (bow and arrow symbol important day for the Thackeray Shinde group the hearing before the Election Commission)

शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाणाचे चिन्ह कुणाला मिळणार याबाबत याआधी २० जानेवारी रोजी पार पडलेल्या सुनावणीदरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांना २३ जानेवारीपर्यंत लेखी उत्तर देण्याचे आदेश दिले होते. तसेच याबाबतची पुढील सुनावणी ३० जानेवारी रोजी घेण्याचे निश्चित केले होते. विशेष म्हणजे २३ जानेवारी याच दिवसापासून शिवसेना पक्षप्रमुखपदाचा उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. याच दिवशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती होती.

- Advertisement -

दरम्यान, विधान भवनात त्यांच्या तैलचित्राच्या अनावरणाचा कार्यक्रम आयोजित करीत शिंदे गटाने ठाकरे गटावर सरशी साधण्याचा प्रयत्न केला होता. बाळासाहेबांच्या तैलचित्र अनावरणाचा सोहळा असतानाही उद्धव ठाकरे हे या ठिकाणी अनुपस्थित होते, हे दाखवण्याचा प्रयत्न करीत बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार आपणच असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून वारंवार करण्यात येत आहे. त्यामुळे एकंदरीतच सध्याचे वातावरण, अनेक नेत्यांची देहबोली आणि अतिआत्मविश्वास पाहता लोकप्रतिनिधी असलेले आमदार, खासदार, नेते आणि कार्यकर्ते यांच्या जोरावर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह आपल्यालाच मिळेल, असा दावा शिंदे गटातील काही नेत्यांकडून करण्यात येत आहे.

दुसरीकडे ठाकरे गटातील नेत्यांमध्ये मात्र शिंदे गटातील नेत्यांप्रमाणे असा उत्साह पाहायला मिळत नाही. याउलट अनेक जण निवडणूक आयोगाचा निकाल आपल्याविरोधात गेल्यास यासाठी आपला ‘प्लॅन बी’ काय असेल, यावर भर देत असल्याचे चित्र आहे. धनुष्यबाण चिन्ह आपल्याला न मिळाल्यास केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाई कशी देता येईल यासाठी तयारी केली जात असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात नुकत्याच एका कार्यक्रमात आपल्यासारख्या ज्वलंत निखार्‍यांनीच मशाल पेटणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांच्या या विधानाकडे गांभीर्याने पाहिले जात असून निवडणूक आयोगाचा निकाल जर विरोधात गेल्यास ठाकरे गटाकडून इतर पर्यायांचीही चाचपणी करण्यात येत आहे.

- Advertisement -

सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयातही सुनावणी सुरू असून पुढील सुनावणी १४ फेब्रुवारी रोजी आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय देण्याचे अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले होते. केंद्रीय निवडणूक आयोगच याबाबत निर्णय देणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान स्पष्ट होताच शिंदे गटातील नेत्यांनी तेव्हापासूनच आनंद व्यक्त करण्यास सुरुवात केली होती. केंद्रीय निवडणूक आयोगात होणार्‍या सुनावणीदरम्यान विजय आपलाच होईल, असा विश्वास तेव्हापासून शिंदे गटाकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आता सुनावण्यांची प्रक्रिया आणि कागदपत्रे दोन्ही बाजूंनी देण्याचा शेवटचा दिवस सोमवार आहे. सोमवारी किंवा याच आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय दिला तर विजय आपलाच होणार, या विश्वासात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील अनेक नेते आहेत.


हेही वाचा – विधान परिषदेच्या 5 जागांसाठी आज मतदान, नाशिक पदवीधर, कोकण शिक्षकमध्ये चुरशीची लढत

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -