धनंजय मुंडेंना मानसिक तणावामुळे ब्रेन स्ट्रोक, चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासा

क्राईम ब्रँचने 20 एप्रिल रोजी रेणू शर्माला मध्य प्रदेशातील इंदूर येथून अटक केली. तिच्यावर धनंजय मुंडेंकडे 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. रेणू शर्माकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नसून तिच्या बँक खात्यांमध्ये मोठे व्यवहार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

dhananjay munde

मुंबईः महाराष्ट्र सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यासंदर्भात दाखल झालेल्या आरोपपत्रात मोठा खुलासा झाला आहे. धनजंय मुंडे यांना ब्रेन स्ट्रोक झाल्याचे सांगण्यात येत आहे. करुणा शर्माच्या बहिणीने केलेल्या छळाच्या आरोपांनंतर धनंजय मुंडे यांना मानसिक तणाव आला होता, त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. 13 एप्रिल रोजी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी रेणू शर्मा हिच्यावर खंडणीच्या आरोपाखाली आरोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

क्राईम ब्रँचने 20 एप्रिल रोजी रेणू शर्माला मध्य प्रदेशातील इंदूर येथून अटक केली. तिच्यावर धनंजय मुंडेंकडे 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. रेणू शर्माकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नसून तिच्या बँक खात्यांमध्ये मोठे व्यवहार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. 2017 मध्ये बँकेच्या ओशिवरा शाखेत उघडलेल्या खात्यात मोठी रक्कम जमा झाली होती आणि फेब्रुवारीमध्ये फक्त 6,652 रुपये शिल्लक होते, असंही पोलीस तपासात उघड झालंय.

‘महिलेने खंडणीच्या पैशातून विकत घेतले डुप्लेक्स’

पोलिसांनी इंदूर-आधारित विकासकाचे जबाब देखील नोंदवले, ज्याने सांगितले की, रेणूने फेब्रुवारीमध्ये इंदूरमधील नेपेनिया रोडवरील बीसीएम पार्कमध्ये सुमारे 54.2 लाख रुपयांना डुप्लेक्स खरेदी केले होते. तिने खंडणीच्या पैशातून डुप्लेक्स खरेदी केल्याचा दावा करणारी कागदपत्रे जोडली. रेणूला हवालामार्फत 50 लाख रुपये आणि आयफोन दिल्याचे मुंडे यांनी सांगितले होते. धनंजय मुंडेंच्या वतीने इंदूरमध्ये रेणूला पैसे दिल्याचे दोन हवाला ऑपरेटर्सनी आपल्या जबाबात स्पष्ट केले होते.

सततच्या छळामुळे मुंडे नैराश्याच्या गर्तेत

आरोपपत्रात म्हटले आहे की, “सततचा छळ आणि खंडणीच्या मागणीमुळे धनंजय मुंडे नैराश्यात गेले होते. त्यांना 12 ते 16 एप्रिलदरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना मेंदूचा झटका आला आणि त्यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यांची हॉस्पिटलायझेशनची कागदपत्रे आणि त्याचा वैद्यकीय अहवालावरून हे उघड झालं आहे.”


हेही वाचाः विधान परिषद मतदानासाठी मलिक, देशमुखांची सुप्रीम कोर्टात धाव