घरमहाराष्ट्रपुणेमुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर कंटेनरचा ब्रेक फेल; सहा वाहनांना दिली धडक

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर कंटेनरचा ब्रेक फेल; सहा वाहनांना दिली धडक

Subscribe

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर गेल्या महिन्याभरात अनेक वाहनांचे अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये आतापर्यंत अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पण अद्यापही वाहनांच्या अपघातांची मालिका संपलेली नसून ती सुरूच आहे.

मुंबई पुणे एक्सप्रेस वे-वर काल सोमवारी (ता. 22 मे) रात्री 11.15 वाजताच्या सुमारास मुंबई लेनवर कि.मी. 36/800 जवळ कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने सहा वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. तर अन्य तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. (Brake failure of container on Mumbai-Pune Expressway; Six vehicles were hit)

हेही वाचा – मुंबई-नागपूर जुन्या महामार्गावर एसटी बस-कंटेनरचा अपघात; 5 जणांचा मृत्यू

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर क्र. RJ-19-GH-4497 हा पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. पण याच वेळी मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर किलोमीटर 36 /800 या ठिकाणी आल्यावर कंटेनरचा ब्रेक फेल झाला. ज्यानंतर या कंटेनरने इको कार क्र. MH-03-DA-8233, क्रेटा कार क्र. MH-43-BN-9114, टाटा जेस्ट कार क्र. MH-14-EU-352, हुंडाई कार क्र. MH-47-K-6112, किया कार क्र. MH 03-EB-9777 आणि स्विफ्ट कार MH-02-BM-9022 या सहा वाहनांना धडक दिली.

कंटेनरची धडक एवढी भीषण होती की, धडक दिलेल्या वाहनातील प्रवाशांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या असल्याचे सांगण्यात आले आहे. तर, महामार्गावर अपघात झाल्याचे समजताच आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, बोरघाट वाहतूक पॉलिसी यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, आरटीओ, लोकमान्य ॲम्बुलन्स यंत्रणा आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर अपघातातील सर्व जखमींना खोपोली नगरपालिका हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. तेथे प्राथमिक उपचार करून जखमींना एमजीएम रुग्णालय पनवेल येथे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

तर या घटनेत गंभीर जखमी झालेले सुभाष पंढरीनाथ चौगुले (वय 45, राहणार वाशी, नवी मुंबई) यांना उपचारासाठी नेत असतानाच त्यांच्या मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. तसेच, चंद्रकला सुभाष चौगुले (वय 43, रा. वाशी), अमित कुमार श्रीहरिराम थठेर (वय 30, रा. भांडुप), कौसर अली शाह (वय 40, रा. भांडूप), आफताब समीउल्ला आलम (वय 19, रा. भांडूप), अफसर अली मोहम्मद अली (वय 36, रा. वडाळा) हे या अपघातात जखमी झाले असून यांना पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे हा अपघात घडल्यानंतर कंटेनर चालकाने कंटेनर घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, बोरघाट वाहतूक पोलीस यंत्रणेने पोलीस उपनिरीक्षक योगेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पाठलाग करून कंटेनर अडवून चालकाला ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले आहे. तर सदर अपघात हा खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाल्याने सहा. पो. नि. हरेश काळसेकर, पोलीस उप निरक्षक आलोक खीसमतराव यांनी आपल्या कर्मचारी वर्गासह पोहचून अपघाताची चौकशी सुरू करत तपास सुरू केल्याची माहिती देण्यात आली आहे. अपघात घडल्यानंतर सर्व सुरक्षा यंत्रणांनी तातडीने उपाययोजना अवलंबत बाधित वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली.

खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला यांनी या अपघाताची गंभीर दखल घेत रात्री उशिरापर्यंत मदत कार्याचा आढावा घेतला. तर खोपोली नगरपालिका रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांना सतर्क करून योग्य उपचार देण्यासाठी खोपोलीचे मुख्याधिकारी अनुप दुरे यांच्याकडून निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे प्राथमिक उपचार तातडीने होऊन जखमींना पुढील उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात पाठविण्यास मदत झाली असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -