प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल करणाऱ्या १७ उद्योजकांचा ‘ब्रॅण्ड महाराष्ट्राचा’ने सन्मान

महाराष्ट्राचे खरे ब्रँड छत्रपती शिवाजी महाराज, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत. महाराष्ट्राच्या या ब्रँड त्रिशूळाला विसरता येणार नाही. असं असताना काही जण महाराष्ट्राचं नाव बदनाम करत आहेत.

“महाराष्ट्राचे खरे ब्रँड छत्रपती शिवाजी महाराज, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत. महाराष्ट्राच्या या ब्रँड त्रिशूळाला विसरता येणार नाही. असं असताना काही जण महाराष्ट्राचं नाव बदनाम करत आहेत. महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात पिछाडीवर आहे अशा वल्गना केल्या जात आहेत. त्यांच्यासाठी ‘ब्रँड महाराष्ट्राचा’ पुरस्कार सोहळा आणि इथे जमलेले यशस्वी उद्योजक हे एकप्रकारचं उत्तर आहे. कोविड काळात उत्तम कामगिरी करणाऱ्या इथे जमलेल्या ‘महाराष्ट्राच्या ब्रँड’ने अशीच यशाची शिखरे पादाक्रांत केली पाहिजेत”, असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी काढले. पुढचे पाऊल ट्रस्ट पुरस्कृत फ्रेम मी मिडिया आणि मिडिया माईंड ॲड्स आयोजित ‘ब्रँड महाराष्ट्राचा’ या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झाले. त्याप्रवेळी ते बोलत होते.

अजून खूप मोठी मजल मारायची आहे

दिवंगत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या ममता सपकाळ आणि शेफ तुषार प्रीती देशमुख यांचा देखील विशेष सन्मान करण्यात आला. सन्मान स्वीकारताना ममता सिंधुताई सकपाळ म्हणाल्या, “खरं तर हा सन्मान माझा नाही तर माझी आई माई सिंधुताई सकपाळ यांचा आहे. खरं तर आईच्या कार्याला सीमा नव्हती. त्या वाटेवरून चालणं एक प्रकारचं आव्हान आहे. ते मी स्वीकारतेय अजून खूप मोठी मजल मारायची आहे”, असेही सावंत यांनी यावेळी म्हटले.

दरम्यान, “शून्यातून उद्योगविश्व तयार करणारे आणि कोरोनाकाळात शेकडो कुटुंबांचा आधार बनलेल्या या उद्योजकांच्या कर्तृत्वाला मानवंदना देण्यासाठी या पुरस्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. भविष्यात देखील अशा होतकरु ब्रॅण्ड्सना सन्मानित करत राहू”, असा मानस पुढचे पाऊल ट्रस्टचे संचालक भरत शिंदे यांनीही व्यक्त केला.

‘फ्रेम मी मीडिया’ आणि ‘मीडिया माइंड ॲड्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांच्या यशोगाथा ‘ब्रँड महाराष्ट्राचा’ या पुरस्कार सोहळ्याद्वारे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न होता. ‘ब्रॅण्ड महाराष्ट्राचा’ समन्वयक समितीचे महासचिव अभिजीत राणे, व्यवस्थापकीय संचालक भरत शिंदे, समन्वयक सचिन नारकर, कार्यवाहक विजय तिवारी यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमाला प्रसाद पाटील आणि निलेश पाटील (निवारा ग्रुप ऑफ कंपनीज), विक्रांत उर्वल (आयआयटीसी ग्लोबल करियर्स), करणजीत सिंग (विथ यू फाउंडेशन ), मयूर देशमुख (ऍग्रोवन फाउंडेशन), अवधूत साठे (अवधूत साठे ट्रेडिंग अॅकॅडमी), डॉ. ओमप्रसाद पडते (मुक्ता रीअॅलिटी), कौशिक भाई मधुभाई कोटिया (योगेश्वर ग्रूप ), अभिजीत घोरपडे (ग्रीनफिल्ड अॅग्रिकेम इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड), संकेत आवटे (संकेत आवटे फाईन टेक प्रायव्हेट लिमिटेड), डॉ. पांडुरंग कदम (संकल्पा एचआरडी प्रायव्हेट लिमिटेड, पुणे), सुनील राठोड (फिनिक्स लँडमार्क), गजानन दळवी (लोकत्रयाश्रय इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड), अमित दळवी (समिरा इन्नोव्हेशन), कन्हैया कदम (सर्वज्ञ हॉस्पिटल अँड के.के. इंडस्ट्रीज, नांदेड), ॲड सुयोग पगाडे (स्वराज्य इन्फ्रास्ट्रक्चर) यांचा सत्कार करण्यात आला.


हेही वाचा – मनसेनंतर शिवसेनेच्या नेत्यांनी घेतले श्रीरामाचे दर्शन, आदित्य ठाकरेंच्या आगमनासाठी जय्यत तयारीला सुरूवात