घरमहाराष्ट्रराज्यात भाकरीचे राजकारण तापले

राज्यात भाकरीचे राजकारण तापले

Subscribe

गरिबांच्या भाकरीची चिंता करणारा आमचाच पक्ष - फडणवीस, मविआत एक पक्ष भाकरी फिरविणारा, दुसरा भाकरीचे तुकडे तोडणारा, तर तिसरा संपूर्ण भाकरीच हिसकावून घेणारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकाच्या दुसर्‍या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात भाकरीवरून राजकारण रंगले होते. यावर पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप हा एकमेव पक्ष आहे, जो गरिबांच्या भाकरीची चिंता करतो, असा दावा केला. सोबतच राज्यात एक पक्ष भाकरी फिरविणारा, दुसरा भाकरीचे तुकडे तोडणारा तर तिसरा संपूर्ण भाकरीच हिसकावून घेणारा आहे, असे म्हणत महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली.

महाविकास आघाडीवर निशाणा साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अडीच वर्षे आपण भ्रष्टाचारी सरकार बघितले. या सरकारचे विसर्जनही बघितले. दाऊदशी संंबंध असलेल्यांना मंत्रीपदे मिळाली. विशेष म्हणजे संजय राऊतांना जामीन मिळाला तर संविधानाचा विजय आणि नवाब मलिकांना जामीन मिळत नाही तर टीका अशी त्यांची अवस्था झाली आहे. सचिन वाझेला परत घेण्यास माझा विरोधच होता. तसा शेराही मी फाईलवर लिहिला होता. आघाडीचे सरकार आल्यानंतर लगेच वाझेला सेवेत घेण्यात आले. वाझे सेवेत आल्यानंतर मातोश्री आणि वर्षावर असायचा, असा आरोपही फडणवीस यांनी केला. उद्धव ठाकरेंनी खुर्चीसाठी विचार सोडला मात्र एकनाथ शिंदेंनी विचारासाठी खुर्ची सोडली. पुढची प्रत्येक निवडणूक भाजप-शिवसेना युतीच जिंकणार आहे. पोपट कधीच मेला आहे हे आता उद्धव ठाकरे यांनी मान्य करावे. आमचे सरकार संवैधानिक असून कार्यकाळ पूर्ण करणार आहे. पुन्हा निवडूनही येणार आहे, असा दावा फडणवीस यांनी केला.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कर्नाटकात पराभव झाल्यावर अनेकांना उकळ्या फुटत आहेत. ज्यांची एकही जागा निवडून आली नाही ते कर्नाटक पॅटर्न महाराष्ट्रात येणार, असा दावा करीत आहेत, परंतु येथे एकच पॅटर्न चालतो, तो म्हणजे मोदी पॅटर्न. कर्नाटकात भाजपला २८ पैकी २५ जागा मिळतील. देशातील १६ राज्यांत भाजपचे सरकार आणि ८ राज्यांत भाजप प्रमुख विरोधी पक्ष आहे. लोकसभेत भाजपचे ३०२, तर राज्यसभेत १०० खासदार आहेत. देशामध्ये १४१५ भाजपचे आमदार आहेत. सगळ्या विरोधकांच्या लोकप्रतिनिधींची एकत्रित संख्या भाजपच्या निम्मीही होत नाही. देशात भाजपच सर्वात मोठा पक्ष आहे, असा दावा फडणवीसांनी केला.

तो वाघ सर्कशीतील असतो
जे बनायचे ते स्वत:च्या भरवशावर बनायला हवे. दुसर्‍यांच्या बळावर ते बनता येत नाही. कुणाचे कितीही बळ घेतले तर वाघ तर बनता येते, पण तो वाघ सर्कशीतील असतो. स्वत:च्या बळावर वाघ झालात तरच तो जंगलाचा राजा असतो, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

- Advertisement -

टीआरपीचे प्रशिक्षण पवारांकडून घ्यावे
कुणाला टीआरपीचे प्रशिक्षण घ्यायचे असेल तर ते शरद पवारांकडून घ्यावे. मीच माझा राजीनामा माझ्या पक्षाकडे देतो, मग माझा पक्ष माझ्या राजीनाम्यावर आक्रोश करतो. मग माझा पक्षच ठराव करतो की मी माझा राजीनामा मागे घ्यावा. त्यानंतर मी राजीनामा मागे घेऊन पुन्हा माझ्याच जागी परततो. राजीनामा देतो म्हणणे आणि राजीनामा देणे यातला फरक काय आहे हे कदाचित शरद पवारांना उद्धव ठाकरेंना सांगायचे होते, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी पवारांच्या खेळीवर टीका केली.

मुंबई महापालिकेतील ठाकरे गटाच्या घोटाळ्यांची पोलखोल करा – जे. पी. नड्डा
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गुरुवारी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारदेखील उपस्थित होतेे.जे. पी. नड्डा यांनी आपल्या मुंबई भेटीत भाजपच्या माजी नगरसेवकांना मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कानमंत्र दिला. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी आतापासूनच कामाला लागा, महापालिकेतील घोटाळे जनतेपुढे आणा, ठाकरे गटाच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करा, शिंदे-फडणवीस सरकारची कामे जनतेपर्यंत पोहचवा, मुंबईतील मुस्लीम, दलित मतदारांना वळवण्याचा प्रयत्न करा, १८ ते २१ वयोगटातील तरुणांची मतदान यादीत मोठ्या प्रमाणात नोंदणी करून घ्या, अशा सूचना जे. पी. नड्डा यांनी दिल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -