घरमहाराष्ट्रएका रात्रीत पाडकाम; स्थानिकांचा आरोप, पडळकर म्हणतात कारवाई योग्य

एका रात्रीत पाडकाम; स्थानिकांचा आरोप, पडळकर म्हणतात कारवाई योग्य

Subscribe

मिरज शहरातील बसस्थानकाजवळ रस्त्या शेजारील दोन हॉटेल, केमिस्ट, दोन ऑफिस, एक घर, पान शॉप मध्यरात्रीच्या सुमारास पाडण्यात आले. जेसीबीच्यी सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. यामुळे एकच खळबळ उडाली.

सांगलीः मिरज येथील रस्त्यालगत असलेल्या बांधकामांवर हातोडा पडल्याने बांधकाम मालक व स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत. भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा भाऊ ब्रम्हानंद पडळकर यांनीच हे बांधकाम पाडल्याचा आरोप आहे. मात्र नियमानुसारच ही कारवाई झाली आहे, असा दावा आमदार पडळकर यांनी केला आहे. त्यामुळे मिरज येथील वातावरण तापले आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त येथे तैनात करण्यात आला आहे.

मिरज शहरातील बसस्थानकाजवळ रस्त्या शेजारील दोन हॉटेल, केमिस्ट, दोन ऑफिस, एक घर, पान शॉप मध्यरात्रीच्या सुमारास पाडण्यात आले. जेसीबीच्यी सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. यामुळे एकच खळबळ उडाली. ब्रम्हानंद पडळकर हे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. त्यांना ही जागा बळकवायची आहे. त्यामुळेच एका रात्रीत या बांधकामांवर हातोडा पडला, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. पालकमंत्री सुरेश खाडे हे या कारवाईमागे असल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

पालकमंत्री सुरेश खाडे यांचा या प्रकरणाशी संबंध नसेल तर त्यांनी ब्रम्हानंद पडळकर व त्यांच्या गुंडांवर कारवाई करावी. त्यांनी तत्काळ अटक करावी, अशी मागणी या कारवाईमुळे बाधित झालेल्यांनी केली आहे. याचा गुन्हा नोंदवला नाही तर पालकमंत्री खाडे यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी या कारवाईचे समर्थन केले आहे. ते म्हणाले, येथील बांधकामांंवर झालेली कारवाई योग्यच आहे. काहीही चुकीचे काम झालेले नाही. हा भूखंड माझ्या भावाच्या नावावर आहे. तेथे अतिक्रमण झाले होते. हे अतिक्रमण तोडण्याची नोटीस माझ्या भावाने गेल्या महिन्यात दिली होती. महापालिकेनेही तशी नोटीस दिली होती. तरीही बांधकाम काही हटवले गेले नाही. त्यामुळे ते पाडण्यात आले आहे. हे बांधकाम काढून आम्ही पालिकेला मदतच केली आहे, असा दावा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला.

- Advertisement -

तसेच त्या भूखंडावर राहणाऱ्यांचा त्या जागेशी काहीही संबंध नाही. तरीही त्यांना बेघर केलेले नाही. म्हैसाळा रोडला त्यांना घरे बांधून दिली आहेत, असे गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केले.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -