ब्रेक द चेन! कोरोना पॉझिटिव्हिटीची आकडेवारी जाहीर; १४ जूनपासून निर्बंध कडक तर काही ठिकाणी शिथिल

break the chain: state government releases corona positivity data

कोरोनाच्या पॉझिटीव्हीटी दरात झालेली घट आणि २७.२ टक्के भरलेले ऑक्सिजन बेड यामुळे मुंबईचा समावेश आता तिसऱ्या स्तरातून दुसऱ्या स्तरात ( लेव्हल) झाल्याने येत्या सोमवारपासून ( १४ जून) मुंबईतील निर्बंध आणखी शिथिल होण्याची दाट शक्यता आहेत. यासंदर्भात मुंबई महापालिकेकडून अंतिम निर्णय घेण्यात येईल.

राज्य सरकारने निश्चित केलेल्या निकषानुसार मुंबई शहर आता दुसऱ्या स्तरात आले आहे. त्यामुळे सरकारच्या निकषानुसार शहरातील दुकाने पूर्णवेळ सुरू राहू शकतील. याशिवाय मॉल्स, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे यांना ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी मिळू शकते. मुंबईच्या लोकलमधून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवास करता येईल. राज्य सरकारने सर्व महिलांना प्रवास करण्याची मुभा दिली आहे. मात्र, याबाबत महापालिकेला निर्णय घ्यावा लागणार आहे.

राज्य सरकारने ५ जूनपासून राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू केली. यासाठी राज्यातील सर्व जिल्हे आणि काही मोठ्या महानगरपालिका यांचे स्वतंत्र प्रशासकीय गट करून त्यांची विभागणी ५ गटात केली होती. दर गुरुवारी जिल्हानिहाय नवी आकडेवारी जाहीर करून त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याला किंवा स्वतंत्र प्रशासकीय गट ठरवण्यात आलेल्या महानगर पालिकांना स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार राज्य सरकारने शुक्रवारी राज्यातील सर्व जिल्ह्यांची ताजी आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार येत्या १४ जूनपासून नवे आदेश लागू करण्याची सूचना केली आहे.

आजच्या आकडेवारीनुसार मुंबई आणि उपनगर जिल्ह्यांसह अहमदनगर, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नंदूरबार, पालघर, परभणी, सोलापूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यातील करोना संसर्गाचा दर पाच टक्क्यांच्या खाली आला आहे. मुंबई वगळता बहुतेक जिल्ह्यात ७५ टक्क्यांहून अधिक ऑक्सिजन बेड रिकामे झाले आहेत. या आकडेवारीच्या आधारे संबंधित जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांनी येत्या सोमवारपासून निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

आजच्या आकडेवारीनुसार स्थानिक जिल्हा प्रशासन आपला जिल्हा किंवा त्यातील महानगर पालिका कोणत्या गटात नव्याने वर्ग करता येतील, किंवा आहे त्याच गटात कायम राहतील किंवा आहे त्याच गटात कायम ठेऊन निर्बंध कठोर होतील, याविषयीचा निर्णय घेईल.

जिल्हानिहाय कोरोना संसर्ग दर

अहमदनगर – २.६३, अकोला – ५.३७
अमरावती – ४.३६, औरंगाबाद – ५.३५
बीड – ५.२२, भंडारा – १.२२
बुलढाणा – २.३७, चंद्रपूर – ०.८७
धुळे – १.६, गडचिरोली – ५.५५
गोंदिया – ०.८३, हिंगोली – १.२०
जळगाव – १.८२, जालना – १.४४
कोल्हापूर – १५.८५, लातूर – २.४३
मुंबई शहर आणि उपनगर – ४.४०,
नागपूर – ३.१३
नांदेड – १.१९, नंदुरबार – २.०६
नाशिक – ७.१२, उस्मानाबाद – ५.१६
पालघर – ४.४३, परभणी – २.३०
पुणे – ११.११, रायगड – १३.३३
रत्नागिरी – १४.१२, सांगली – ६.८९
सातारा – ११.३०, सिंधुदुर्ग – ११.८९
सोलापूर – ३.४३, ठाणे – ५.९२
वर्धा – २.०५, वाशिम – २.२५
यवतमाळ – २.९१

जिल्ह्यनिहाय भरलेले ऑक्सिजन बेड (टक्के)

अहमदनगर: १२.७७, अकोला: १९.०२,
अमरावती : १६.५७, औरंगाबाद: १०.८६
बीड: ११.३५, भंडारा : १.६०
बुलढाणा : ९.०३, चंद्रपूर : ४.९५
धुळे : २.१५, गडचिरोली : ४.२८
गोंदिया : १.८७, हिंगोली : ६.७७
जळगाव : १३.९८, जालना : ५.२९
कोल्हापूर : ६७.४१, लातूर : ८.६६, मुंबई- मुंबई उपनगर : २७.१२, नागपूर : ३.९३,
नांदेड : २.५, नंदूरबार : ६.१९
नाशिक : १४.७१, उस्मानाबाद : ८.१३,
पालघर :२७.६६, परभणी : १२.५,
पुणे : १३, रायगड : २१.३२,
रत्नागिरी : ४८.७५, सांगली : २९.७१,
सातारा :४१.०६, सिंधुदुर्ग : ५१.५९,
सोलापूर : १४.६६, ठाणे : १२.७८,
वर्धा : १.५७, वाशिम : ९.०१
यवतमाळ : ५.२८

मुंबईचा समावेश दुसऱ्या गटात

संसर्ग दर हा ५ टक्के आणि २५ ते ४० टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन बेड्स भरले आहेत अशा जिल्ह्यांचा समावेश सरकारने दुसऱ्या गटात केला आहे. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगराचा समावेश या गटात होत असून १४ जूनपासून मुंबईकरांना अधिक दिलासा मिळू शकतो. याबाबत मुंबई महापालिकेकडून लवकर निर्णय अपेक्षित आहे.

दुसऱ्या गटातील जिल्हा किंवा शहरातील सार्वजनिक ठिकाणे, मैदाने खुली राहतील. वॉकिंग आणि सायकलिंगला परवानगी असेल. सर्व खासगी कार्यालये उघडण्याची परवानगी असेल. शासकीय कार्यालयेही १०० टक्के कर्मचारी क्षमतेने सुरू करता येतील. विविध खेळांसाठी सकाळी ५ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते रात्री ९ अशी वेळ राहील. चित्रीकरण नियमितपणे करता येईल. सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांना ५० टक्के उपस्थितीची मर्यादा असेल. लग्न सोहळ्यासाठी हॉलमधील आसनक्षमतेच्या निम्मे किंवा जास्तीत जास्त १०० जणांच्या उपस्थितीत परवानगी असेल. अंत्यविधीसाठी बंधन असणार नाही. जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्सना ५० टक्के क्षमतेने परवानगी. सार्वजनिक वाहतूक सेवा १०० टक्के क्षमतेने सुरू होईल. आसन क्षमतेइतकेच प्रवासी प्रवास करू शकतील. जमावबंदी लागू असेल.