(Bribery case) मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर थेट अमेरिकेत लाचखोरीचे आरोप झाले आहेत. अपेक्षेप्रमाणे अदानी समूहाने हे आरोप फेटाळले आहेत. पण अमेरिकेतील प्रकरणामुळे देशाची लाज जगाच्या वेशीवर टांगली गेली आहे. अदानी यांची ‘सावली’ बनलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचे काय प्रायश्चित्त घेणार आहेत? असा प्रश्न विचारत ठाकरे गटाने शरसंधान केले आहे. (Thackeray group targets PM Modi over Adani case)
अदानी यांच्यावर थेट अमेरिकेत लाचखोरीचे आरोप झाले आहेत. पुन्हा तेथील विरोधी पक्षांनी वगैरे ते केलेले नाहीत तर, अमेरिकेतील सरकारी वकिलांनी केले आहेत आणि तेदेखील तेथील न्यायालयात. अमेरिकी न्याय विभागाच्या ‘यूएस ऍटर्नी ऑफिस’अंतर्गत येणाऱ्या ईस्ट डिस्ट्रिक्ट ऑफ न्यूयॉर्क कार्यालयाने हे आरोपपत्र सादर केले आहे, असे ठाकरे गटाने सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.
हेही वाचा – Politics : भाजपाने घेतलेली उडी म्हणजे…, अदानी प्रकरणी ठाकरे गटाचा थेट हल्लाबोल
मोदी सरकारचे अदानीप्रेम देशाच्या मुळावर उठले आहे. अमेरिकेतील लाचखोरी प्रकरणामुळे अदानी महाशयांचा पाय किती खोलात जातो ते समजेलच, परंतु देशाच्या स्वयंघोषित ‘चौकीदारां’चे आता काय होणार? अमेरिकेतील चौकीदाराने अदानींच्या गैरव्यवहारांवर कायद्याचा दंडुका हाणला. आपल्याकडचे स्वतःला देशाचे ‘चौकीदार’ म्हणवून घेणारे मात्र कायम अदानींना पाठीशी घालत आले, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.
गेल्या वर्षी हिंडेनबर्ग प्रकरणात चौकशीचा फार्स भारतात असल्याने पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारला गौतम अदानी यांना वाचविणे शक्य झाले होते. त्या प्रकरणात ना ‘सेबी’च्या तत्कालीन अध्यक्षा माधवी बूच आणि त्यांच्या पतीवर काही कारवाई झाली होती ना अदानी समूहावर. मात्र आता ‘आरोपीचा पिंजरा’ अमेरिकेतील न्यायालयामधील आहे. त्यामुळे तेथील ‘हातोड्या’ने अदानी यांना किती मोठे ‘टेंगूळ’ येते आणि त्याच्या वेदना मोदी सरकारला किती होतात, हे पाहावे लागेल, अशी बोचरी टीकाही ठाकरे गटाने केली आहे.
हेही वाचा – Gautam Adani : गौतम अदानींवर आंतरराष्ट्रीय संकट; केनियाने अदानींसोबतचा करार केला रद्द
अदानी यांना काही शिक्षा झाली तर ते त्यांच्या पापाचे फळ असेल, परंतु मोदी सरकारच्या अदानीप्रेमामुळे आज देशावर डाग लागला आहे. एका उद्योगपतीवरील प्रेमापोटी मोदी सरकारने देशाच्या इभ्रतीचाही जो ‘व्यवहार’ केला तो अधिकार कोणी दिला? अदानी, लाचखोरीच्या माध्यमातून त्यांनी मिळविलेली देश-परदेशातील कोट्यवधींची कंत्राटे आणि त्यासाठी त्यांना होणारी मोदी सरकारची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत या एकाच नाण्याच्या ‘तीन बाजू’ आहेत. या तिन्ही बाजू जर अमेरिकन न्यायालयात आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या राहिल्या तर त्यामुळे जगासमोर देशाची मान खाली झुकेल, त्याला जबाबदार कोण? अशी विचारणा ठाकरे गटाने केली आहे.
अदानी त्यांचे काय ते भोगतील. त्यांच्या शेअर्सचे भाव कोसळले. त्यांची संपत्ती, जागतिक रँकिंग वगैरे घसरले. तो त्यांचा प्रश्न, परंतु या प्रकरणामुळे संपूर्ण शेअर बाजाराला जो तडाखा बसला आणि सामान्य गुंतवणूकदारांचे काही लाख कोटी रुपये एका क्षणात वाया गेले. ते नुकसान कसे भरून निघणार? मोदी सरकारच्या अदानीप्रेमाची शिक्षा देशाने, येथील जनतेने का भोगायची? असे प्रश्नही या अग्रलेखात करण्यात आले आहेत. (Bribery case: Thackeray group targets PM Modi over Adani case)
हेही वाचा – Bribery case : अदानी प्रकरणातून मार्ग काढता येईल, अमेरिकेने केले आश्वस्त