घर उत्तर महाराष्ट्र नाशिक मनपा शिक्षणाधिकरी सुनीता धनगर यांच्याकडे मोठं घबाड

नाशिक मनपा शिक्षणाधिकरी सुनीता धनगर यांच्याकडे मोठं घबाड

Subscribe

नाशिक :  तक्रारदार मुख्याध्यापकास शैक्षणिक सेवेत रुजू करुन न घेणार्‍या संस्थेवर कारवाईचे पत्र देण्याच्या मोबदल्यात महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्यासह एका लिपिकाला कार्यालयातच शुक्रवारी (दि.२) दुपारी ५५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. दोघांना अटक करुन शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार असून, दोघांच्या घरांची झडती सुरू आहे. या लाचखोरीमुळे महापालिकेच्या शिक्षण विभागातील लाचखोरी चव्हाट्यावर आली आहे. दोघांवर सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

सुनीता सुभाष धनगर (वय ५७, रा. रचित सनशाइन, उंटवाडी, नाशिक) व नितीन अनिल जोशी (४५, रा. पुष्पांकुर, चव्हाणनगर, तपोवन, नाशिक) अशी दोन लाचखोरांची नावे आहेत. धनगर या वर्ग दोनच्या अधिकारी आहेत. तर, जोशी हा वर्ग तीनचा कर्मचारी आहे. ५० वर्षीय तक्रारदार हा मुख्याध्यापक असून, तो एका खासगी शैक्षणिक संस्थेत कार्यरत होता. दरम्यान संस्थेने त्यांना बडतर्फ केले. या कारवाईविरोधात त्यांनी नाशिकच्या शैक्षणिक न्यायाधीकरणात दाद मागितली होती.

- Advertisement -

न्यायाधिकरणाने बडतर्फीच्या कारवाईस स्थगिती दिली. तरीदेखील संस्थेने या मुख्याघ्यापकास सेवेत दाखल करून घेतले नाही. याप्रकरणी तक्रारदाराने महापालिकेच्या शिक्षणाधिकारी धनगर यांच्याकडे संस्थेवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी अर्ज केला होता. धनगर यांनी संस्थेवर कारवाई करण्याचे पत्र देण्यासाठी तक्रारदार मुख्याध्यापकाकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिककडे तक्रार दाखल केली. त्यानुसार पथकाने शहानिशा करून सापळा रचला. धनगर व लिपिक जोशी यांनी कार्यालयातच तक्रारदाराकडून ५५ हजारांची लाच स्विकारली.

लिपिक जोशी याने आदेशाचे पत्र बनवण्याच्या मोबदल्यात पाच हजार रुपयांची लाच घेतली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे- वालावलकर, उपअधीक्षक नरेंद्र पवार, वैशाली पाटील यांच्या सूचनेने पोलीस निरीक्षक संदीप घुगे, गायत्री जाधव, पोलीस हवालदार एकनाथ बाविस्कर, पोलीस नाईक प्रकाश महाजन, नितीन नेटारे यांनी सापळा यशस्वी केला.

सत्याचा विजय; धनगर मॅडमचा खरा चेहरा पुढे आला : भावे

- Advertisement -

नाशिक : भ्रष्ट अधिकारी हा अधिकारीच असतो. तो महिला वा पुरुष नसतो, हेच मी सव्वा वर्षापूर्वी निक्षून सांगत होतो. परंतु, महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनी माझ्या फेसबुक लाईव्हचा विपर्यास करत माज्यावर लांछन लावले. गुन्हा दाखल केला. आज मात्र धनगर मॅडमचा खरा चेहरा जनतेसमोर आला. सत्याचा विजय झाला आहे, अशी प्रतिक्रिया आम आदमी पक्षाचे माजी राज्य प्रवक्ते जितेंद्र भावे यांनी दिली. लाचखोरीच्या प्रकरणात धनगर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्यानंतर ते बोलत होते.

नाशिकमध्ये २१ डिसेंबर २०२१ रोजी जितेंद्र भावे यांनी फेसबूक लाईव्ह करत सुनीता धनगर यांच्या भ्रष्ट कारभाराचा समाचार घेतला होता. त्यावेळी त्यांनी ‘वस्त्रहरणा’चा या उल्लेखावर आक्षेप घेत पोलिसांत धाव घेतली होती. त्यानंतर भावेंवर गुन्हा दाखल होऊन एका दिवसासाठी त्यांना अटकही करण्यात आली होती.

महत्वाचे म्हणजे या सार्‍या प्रकरणाची दखल घेत आम आदमी पक्षाने भावेंची हकालपट्टीही केली होती. धनगर यांना लाच घेताना पकडल्यानंतर भावे यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, मराठी साहित्यातील संदर्भांचा विचार केला तर वस्त्रहरण याचा अर्थ भांडाफोड करणे किंवा गैरकारभार उघडकीस आणणे असा होता. परंतु, धनगर यांनी आमच्याच पक्षाच्या काहींना हाताशी धरुन आणि त्यांच्या स्त्रित्वाचा फायदा घेत माझ्यावर अश्लिल शब्दप्रयोग केल्याचा गुन्हा दाखल केला. वास्तविक, मूळ विषय हा त्यांच्या भ्रष्टाचाराचा होता. त्या भ्रष्टाचारीच होत्या. त्यामुळे त्या राष्ट्रद्रोहीच आहेत, हे शुक्रवारी झालेल्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भ्रष्ट आचरणाचे वस्त्रहरण खर्‍या अर्थाने आज झाले आहे. मला चुकीच्या प्रकरणात गोवणार्‍या धनगरांसारख्यांचा मी निषेध करतो, असेही भावे यांनी सांगितले.

- Advertisment -