उजळले तांबे; महाविकासचे ‘पितळ’ पडले उघडे

हेमंत भोसले । नाशिक

उत्तर महाराष्ट्रात तब्बल २० आमदार आणि महापालिकेसह जिल्हापरिषदेचे असंख्य आजी- माजी लोकप्रतिनिधींची फौज असलेल्या महाविकास आघाडीला एका अपक्ष उमेदवाराने धूळ चारणे ही बाब शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची यंत्रणा किती कुचकामी आहे याबाबीला अधोरेखित करते. महत्वाचे म्हणजे महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या सुमारे सहा मोठ्या शिक्षण संस्था असतानाही त्याचा फायदा शुभांगी पाटील यांना होऊ नये हे विशेष. डॉ. सुधीर तांबे यांनी मतदार संघात केलेली पेरणी, सत्यजित यांच्या कार्यशैलीचेे युवकांना असलेले आकर्षण, बाळासाहेब थोरात यांनी संपूर्ण निवडणुकीदरम्यान धारण केलेले मौन व अखेरपर्यंत जाहिरपणे पाठिंबा न देण्याची भाजपची भूमिका या बाबींनी तांबेंचा विजयाचा मार्ग प्रशस्त केला.

राजकीयदृष्ठ्या अतिशय किचकट आणि अवघड असलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबे यांचा झालेला विजय हा महाविकासच्या थोबाडीत मारणारा असाच ठरला. डॉ. सुधीर तांबे यांनी काँग्रेसने दिलेली उमेदवारी नाकारुन आपल्या पुत्रास अपक्ष उमेदवारीची पुढची चाल दिल्यानंतर स्वाभाविकपणे काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी टोकाचा राग व्यक्त केला. त्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आघाडीवर होते. तर दुसरीकडे तांबे यांचे निकटचे नातेवाईक असलेले बाळासाहेब थोरात यांनी मात्र या संपूर्ण निवडणुकीत मौन धारण करणेच पसंत केले. या मौनातूनच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना थोरातांचा ‘मूक संदेश’ मिळाला आणि ही मंडळी तांबेंसाठी कार्यरत झाली. महत्वाचे म्हणजे भाजपने अखेरपर्यंत जाहिरपणे पाठिंबा न दिल्याने तांबेंपासून काँग्रेसची मते फुटली नाही.

या मतदारसंघाची पेरणी करताना डॉ. सुधीर तांबे यांनी स्वत:च्या जनसंपर्क वाढीबरोबर काँग्रेसचेही संघटन वाढवले आहे. भाजपने तांबेंना पाठिंबा दिला असता तर ही काँग्रेसी मंडळी तटस्थ राहिली असती किंवा तांबेंच्या विरोधात तरी गेली असती. परंतु, भाजपने पाठिंबा न दिल्यामुळे अपक्ष उमेदवारास मत देण्यास काँग्रेस विचारसरणीच्या मतदारांना अडचण आली नाही. असे असले तरी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सत्यजितचा विजय निश्चित आहे, असे सातत्याने बोलत राहिले. तर खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी ‘भूमीपुत्राला विजयी करण्यासाठी प्रयत्न करा’ असे सूचित करत भाजपच्या मतांनाही गोळा करण्याचे काम केले. या सर्वच खेळी तांबेंचा विजय बळकट करत गेल्या. या संपूर्ण निवडणुकीत तांबे यांनी आपल्या निवडणूक यंत्रणेचा पूर्णत: फायदा घेतला. उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक मतदान केंद्रांबाहेर तांबेंचे बुथ लागलेले होते. पोलिंग एजंट होते. याउलट शुभांगी पाटील यांचे असंख्य केंद्रांबाहेर बुथही दिसले नाहीत. महाविकास आघाडीने जर पाटील यांना जाहिरपणे पाठिंबा दिला होता तर मग शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने निवडणूक यंत्रणा का उभी करण्यात आली नाही?

तीन पक्षांना अशी यंत्रणा उभी करणे डाव्या हाताचा खेळ होता. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी पाटलांच्या विजयासाठी काहीसे प्रयत्न केले. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादीने तर हाताची घडी बांधलेली होती. इतकेच नाही तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी देखील तांबेंविरोधात टोकाची विधाने केली नाहीत. जणू काही तांबेंच्या अपक्ष उमेदवारीला सर्व पक्षांनी छुपा पाठिंबा दिला होता. महत्वाचे म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेत गेलेले आमदार वगळता उत्तर महाराष्ट्रात महाविकासच्या आमदारांची फौज आहे. शिवाय महाविकास आघाडीच्या नेत्यांचे प्रभुत्व असलेल्या अनेक शिक्षण संस्थाही उत्तर महाराष्ट्रात आहेत. यात अहमदनगर जिल्ह्यातील रयत शिक्षण संस्था, नाशिकमधील मराठा विद्याप्रसारक संस्था, छगन भुजबळ यांची भुजबळ नॉलेज सिटी, प्रशांत हिरे यांची महात्मा गांधी विद्या मंदिर, धुळ्यातील कृणाल पाटील यांची शिवाजी विद्याप्रसारक, जवाहर मेडिकल फाऊंडेशन, उल्हास पाटील यांची गोदावरी शिक्षण संस्था, राजाराम पानगव्हाणे यांची ब्रह्मा व्हॅली, आमदार किशोर व नरेंद्र दराडे यांची मातोश्री एज्युकेशन सोसायटी, रविंद्र सपकाळ यांची सपकाळ नॉलेज हब, पंढरीनाथ थोरे अध्यक्ष असलेली व्ही. एन. नाईक शिक्षण संस्था आदी शिक्षण संस्थांचा समावेश आहे. इतक्या सार्‍या संस्था महाविकासच्या हाताशी असतानाही शुभांगी पाटील यांचा पराभव होणे ही बाब नेते आणि संस्थांनी पाटलांना उपर्‍या नजरेनेच पाहिल्याचे संकेत देते. दुसरीकडे तांबे यांना त्यांची स्वत:ची अमृतवाहिनी आणि विखेंची प्रवरा संस्थेने तारले. या दोन्ही संस्थांमधील कर्मचार्‍यांनी तांबेंसाठी तन- मन- धन अर्पण केले. त्याची परिणीती म्हणजे महाविकास आघाडीचा रोष पत्करुनही अपक्ष उमेदवारी करणार्‍या सत्यजित तांबे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली.