घरताज्या घडामोडीस्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी मोफत लाकडांऐवजी 'ब्रिकेट्स बायोमास'चा होणार वापर

स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी मोफत लाकडांऐवजी ‘ब्रिकेट्स बायोमास’चा होणार वापर

Subscribe

स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आता ‘ब्रिकेट्स बायोमास’चा वापर करण्यात येणार आहे. लाकडांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी आता महापालिकेने ‘शेती कचरा व वृक्ष कचरा’ यांपासून निर्मित पर्यावरण पूरक ‘ब्रिकेट्स बायोमास’चा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आता ‘ब्रिकेट्स बायोमास’चा वापर करण्यात येणार आहे. लाकडांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी आता महापालिकेने ‘शेती कचरा व वृक्ष कचरा’ यांपासून निर्मित पर्यावरण पूरक ‘ब्रिकेट्स बायोमास’चा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, पाकिकेच्या १४ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करताना यापुढे प्रायोगिक तत्वावर ‘ब्रिकेट्स बायोमास’चा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे डॉ.मंगला गोमारे यांनी सांगितले.

पालिकेच्या १४ स्मशानभूमीत या ‘ब्रिकेट्स बायोमास’ चा वापर प्रयोगिक तत्वावर होणार आहे. त्यामुळे स्मशानात लाकडे जाळल्यामुळे होणारे प्रदूषण कायमस्वरूपी बंद होणार आहे. परिणामी प्रत्येक मृतदेहावर होणारा ३०० किलो मोफत लाकडांचा खर्च वाचणार आहे. पर्यावरण रक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने सर्वस्तरिय प्रयत्न करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत. या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे मृतदेह दहनासाठी विविध पर्यायांची चाचपणी करण्यात आली.

- Advertisement -

या चाचपणी अंती ‘शेती कचरा व वृक्ष कचरा’ यापासून तयार केलेल्या ‘ब्रिकेट्स बायोमास’चा वापर हा तुलनेने अधिक पर्यावरणपूरक असल्याचे निदर्शनास आले. पारंपरिक स्मशानभूमीमध्ये प्रत्येक मृतदेहासाठी ३०० किलो लाकूड हे महापालिकेद्वारे मोफत पुरविण्यात येते. हे ३०० किलो लाकूड साधारणपणे २ झाडांपासून मिळते. मात्र, आता पर्यावरणपूरकतेचा भाग म्हणून महापालिका क्षेत्रातील १४ स्मशानभूमींमध्ये लाकडाऐवजी ‘ब्रिकेट्स बायोमास’चा वापर करण्यात येणार असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.मंगला गोमारे यांनी दिली आहे.

महापालिकेच्या ज्या १४ स्मशानभूमींमध्ये लाकडांऐवजी ‘ब्रिकेट्स बायोमास’चा वापर पहिल्या टप्प्यात करण्याचे निर्धारित करण्यात आले आहे, त्या १४ स्मशानभूमींमध्ये दरवर्षी साधारणपणे ६ हजार २०० इतक्या मृतदेहांना अंतिम निरोप देण्यात येतो. ही बाब लक्षात घेतल्यास या ठिकाणी वर्षभरात साधारणपणे १८ लाख ६० हजार किलो एवढ्या प्रमाणातील लाकडांचा वापर मृतदेह दहनासाठी होतो. प्रत्येक मृतदेह दहनासाठी ३०० किलो लाकडाची गरज असते. मात्र, लाकडांपेक्षा ‘ब्रिकेट्स बायोमास’ मुळे प्राप्त होणारी ‘ज्वलन उष्णता’ अधिक असल्याने प्रत्येक मृतदेहासाठी २५० किलो ‘ब्रिकेट्स बायोमास’ पुरेसे असते.

- Advertisement -

१४ स्मशानभूमी

लाकडांऐवजी ‘ब्रिकेट्स बायोमास’चा वापर करण्यासाठी ज्या १४ स्मशानभूमींची निवड करण्यात आली आहे. यामध्ये ‘डी’ विभागातील मंगलवाडी स्मशानभूमी, ‘ई’ विभागातील वैकुंठधाम हिंदू स्मशानभूमी, ‘एफ/उत्तर’ विभागातील गोयारी हिंदू स्मशानभूमी, ‘जी/उत्तर’ विभागातील धारावी हिंदू स्मशानभूमी, ‘एच/पश्चिम’ विभागातील खारदांडा हिंदू स्मशानभूमी, ‘के/पश्चिम’ विभागातील वर्सोवा हिंदू स्मशानभूमी, ‘पी/ उत्तर’ विभागातील मढ हिंदू स्मशानभूमी, ‘आर/दक्षिण’ विभागातील वडारपाडा हिंदू स्मशानभूमी, ‘आर/उत्तर’ विभागातील दहिसर हिंदू स्मशानभूमी, ‘एल’ विभागातील चुनाभट्टी हिंदू स्मशानभूमी, ‘एम/पूर्व’ विभागातील चिताकॅम्प हिंदू स्मशानभूमी, ‘एम/पश्चिम’ विभागातील आणिक गाव हिंदू स्मशानभूमी, ‘एस’ विभागातील भांडुप गुजराती सेवामंडळ स्मशानभूमी आणि ‘टी’ विभागातील मुलुंड नागरिक सभा हिंदू स्मशानभूमी अशा १४ स्मशानभूमींचा वापर करण्यात येणार आहे.

इलेक्ट्रिक व्हेईकल धोरण राज्य शासनाकडून मंजूर

मुंबईत वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहनांमधून निघणाऱ्या धुरामुळेही प्रदूषण निर्माण होते. तसंच, मुंबईत पेट्रोल, डिझेल या इंधनाच्या वापरामुळे वाहनांद्वारे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी इलेक्ट्रिक व्हेईकल धोरण राज्य शासनाकडून मंजूर करून घेतले आहे. त्याचप्रमाणे मुंबईसाठी खास इलेक्ट्रिक व्हेईकल धोरण बनविण्यात येत आहे. बेस्ट उपक्रमात ३८६ बस गाड्या या इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या आणल्या आहेत. यापुढे मुंबईत व राज्यात शासकीय व पालिका स्तरावर इलेक्ट्रिक वाहनांचा अधिकाधिक वापर करण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेत यापुढे इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यात येणार आहे. मुंबई शहरातील प्रदूषण हळूहळू कमी करण्याचा पालिकेचा उद्देश आहे. त्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबई शहर प्रदूषण मुक्त होऊन पर्यावरण पूरक शहर होण्याच्या मार्गावर आहे. मुंबईत प्रदूषणाला कारणीभूत पेट्रोल, डिझेल या इंधनावर चालणाऱ्या वाहनांची जागा आता हळूहळू इलेक्ट्रिक वाहने घेऊ लागली आहेत. त्यामुळे भविष्यात पेट्रोलियम इंधनामुळे होणारे प्रदूषण कमी होणार आहे. आता पालिकेच्या स्मशानभूमीतही मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी वापरण्यात येणारी लाकडे बंद होऊन त्या ऐवजी ‘शेती कचरा व वृक्ष कचरा’ यांपासून निर्मित पर्यावरण पूरक ‘ब्रिकेट्स बायोमास’ यांचा वापर सुरू करण्यात येत आहे.


हेही वाचा – राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी – रामदास आठवले

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -