जळगाव : नुकतेच राजधानी दिल्लीमध्ये G-20 शिखर परिषद पार पडली. यावेळी जगभरातील महत्त्वाच्या देशाचे प्रमुख या परिषदेसाठी भारतात आले होते. ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांनी देखील या परिषदेला हजेरी लावली होती. या परिषदेच्यानिमित्ताने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा निमंत्रण देण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांना भेटले. या भेटीवेळी सुनक यांनी राज्यातील युटी म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्याबद्दल महत्त्वाची माहिती सांगितल्याचा गौप्यस्फोट केला आहे. (British PM Rishi Sunak gave important information about Uddhav Thackeray, CM Eknath Shinde serious allegations)
हेही वाचा – व्हिडीओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून…, मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांचा केला निषेध
काल (ता. 12 सप्टेंबर) जळगाव जिल्ह्यातील पाचोरामध्ये शासन आपल्या दारी हा शासनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची त्यांचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासोबत नेमके काय बोलणे झाले याबाबतची माहिती दिली. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आपला देश महासत्तेकडे चालला आहे. आज आपल्या देशाचे नाव लोक अभिमानाने घेऊ लागले आहेत, मग यांना पोटदुखी का असावी. काही करार केले त्यामुळे आपल्या देशात मोठ्या प्रमाणात उद्योग येतील. आपल्याला नोकऱ्या मिळतील, स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी काम मिळेल. मग याची पोटदुखी का? उलट याचं स्वागत करायला पाहिजे, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे.
तसेच, मी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना भेटलो. ते आपल्या भारतातील जुने नागरिक. त्यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भेटला आणि मलाही आपला माणूस ब्रिटिश देशाचा पंतप्रधान झाला याचा अभिमान होता. काही लोकांनी त्यावर टीका केली. काय भेटले, कसे भेटले, काय बोलले, कुठल्या भाषेत बोलले याला काय अर्थ आहे. मी त्यावर बोलणार नव्हतो, पण त्यांनी विचारले म्हणून मी मुद्दाम सांगतो, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
ऋषी सुनक यांनी मला विचारले की, यूटी कसे आहेत. त्यावर मी विचारले का? तर ते म्हणाले की, ते दरवर्षी लंडनला येतात. मोठ्यामोठ्या संपत्ती घेतात, थंडगार हवा खातात. त्यांची खूप माहिती माझ्याकडे आहे. तुम्ही एकदा लंडनला आलात की, मी सगळं सांगतो. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना विचारले की, यूटी म्हणजे काय हे तुम्हाला माहीत असेल. त्यावर उपस्थितांनी उद्धव ठाकरे असे म्हटले. ज्यांतर मुख्यमंत्री शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, मी एवढेच सांगतो की, आम्हाला सगळं माहिती आहे. आमच्यावर बोलण्याची वेळ येऊ देऊ नका. अन्यथा पाटणकर काढा घेण्याची वेळ येईल, असा इशारा त्यांच्याकडून उद्धव ठाकरे यांना देण्यात आला आहे.