घरताज्या घडामोडीभावजयीचा खून करुन फरार झालेला दीर गजाआड

भावजयीचा खून करुन फरार झालेला दीर गजाआड

Subscribe

कौटुंबिक वादातून भावजयीचा धारदार शस्त्राने खून करुन फरार झालेल्या दिरास पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गुरूवारी (दि.४) अंबड परिसरातून अटक केले. अनिल ऊर्फ मिर्ची पांडुरंग पाटील (३०) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पंचवटीतील रामनगर येथील सुनील पांडुरंग पाटील व ज्योती पाटील यांच्या समवेत दिर अनिल पाटील राहतो. सुनील पाटील हे मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करतात. मंगळवारी (दि.२) अनिल पाटील व भावजयी ज्योती पाटील यांच्यात कौटुंबिक कारणावरुन वाद झाला. पाटील याने भावजयीस शिवीगाळ करत धारदार शस्त्राने त्यांच्या गळ्यावर वार केले. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर दिर फरार झाला. उपचारासाठी पती सुनील पाटील यांनी पत्नीस जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस दिराचा शोध घेत असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गुरूवारी त्याला अंबड परिसरातून अटक केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -