नागपूर : राज्यभरात आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता होणार आहे. अधिसूचना जारी झाल्यापासून 28 दिवस निवडणूक प्रचार सुरू होता. आज निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यातच काल (रविवारी) नागपूरमध्य काँग्रेस उमेदवार ऋषीकेश उर्फ बंटी शेळके यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जर तुमची दारू प्यायची इच्छा झाली, तर भाजपवाल्यांनी तुमच्या घरी पाठवलेली दारू घ्या, मात्र मत काँग्रेसला द्या अशा वादग्रस्त वक्तव्यामुळे ते सध्या चर्चेत आले आहेत. (Rushikesh Bunty Shelke said but vote for congress.)
हेही वाचा : Rahul Gandhi : बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्यतिथीनिमित्त राहुल गांधी यांची पोस्ट…म्हणाले…
रविवारी नागपुरामध्ये बंटी शेळके यांच्यासाठी प्रियंका गांधी यांच्या रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. प्रियंका गांधी त्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वी बंटी शेळके यांनी रोड शोसाठी आलेल्या शेकडो काँग्रेस कार्यकर्ते आणि मतदारांसमोर भाषण केले होते. त्यावेळी त्यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून खळबळ माजली आहे. त्यांनी भाषणात सांगितले की, भाजपा पक्ष भ्रष्टाचाराचे पैशातून ही निवडणूक लढवत आहे. त्यांच्याकडे खूप पैसा आहे. त्यामुळे ते तुमच्या घरी आमिष म्हणून दारू घेऊन आले आणि तुमची ती पिण्याची इच्छा झाली, तर ती दारू तुम्ही घेऊन घ्या. जर भाजपवाले त्यांच्या भ्रष्टाचाराचा पैसा घेऊन तुमच्या घरी आले, तर तुम्ही तेही ठेऊन घ्या. मात्र मत काँग्रेसला द्या. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता ते चांगलेच चर्चेत आले आहेत.
हेही वाचा : Eknath Shinde : मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत मी…, निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे काय म्हणाले
तसेच ते पुढे म्हणाले की, मी तर पैसे वाटू शकत नाही. मात्र त्यांच्याकडे भ्रष्टाचाराचा खूप पैसा आहे. जर तुम्हाला त्यांच्याकडून पैसा घ्यायचा असेल तर घ्या पण मतदान हे काँग्रेस पक्षालाच करा, असे ते म्हणाले आहेत. जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी ही लढाई आहे. माझ्याकडे वाटण्या इतका पैसा नाही. नगरसेवक असूनही माझ्याकडे फक्त दुचाकीच आहे. मी आजही दुचाकीवर आहे आणि उद्याही दुचाकीवरच राहणार, असेही ते म्हणाले आहेत. मात्र त्यांच्या या वक्तव्यावर आता भाजपा पक्ष काय प्रतिक्रिया देणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.
Edited By Komal Pawar Govalkar