घरमहाराष्ट्रधक्कादायक! रागाने बघण्यावरून झाला वाद, पेट्रोल ओतून जिवंत जाळले

धक्कादायक! रागाने बघण्यावरून झाला वाद, पेट्रोल ओतून जिवंत जाळले

Subscribe

बदलापूर येथील वांगणीतील खळबळजनक घटना

किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून चंद्रकांत पवार या ४८ वर्षीय इसमाला पेट्रोल ओतून पेटवून दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. ही घटना बदलापूर येथील वांगणी जवळील डोणे वाडीत येथे घडली आहे. याप्रकरणी कुळगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून वयवर्ष २५ असणाऱ्या निखिल गुरव याला अटक केली आहे. डोणेवाडी येथील विश्वनाथ अपार्टमेंटमध्ये गुरुवारी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

नेमके काय घडले?

या घटनेच्या आठ -दहा दिवसांपूर्वी या इमारतीत राहणारे चंद्रकांत पवार यांची २४ वर्षीय मुलगी घराचे वीज बिल घेण्यासाठी संकुलातील सी विंग मध्ये गेली होती. त्यावेळी तेथे असलेल्या प्रमिला गुरव तिला माझ्याकडे रागाने काय बघतेस, असे बोलल्यावरून त्यांच्यात शाब्दिक वाद झाला व तेथेच मिटला. त्यानंतर गुरुवारी प्रमिला गुरव यांचा मुलगा निखिल गुरव दारू पिऊन पवार यांच्या घरी आला व त्याने पवार यांच्या पत्नीला तसेच मुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ केली. त्याचवेळी बाहेरून घरी आलेल्या चंद्रकांत पवार यांच्यावर निखिलने त्याच्यासोबत आणलेल्या बाटलीतील पेट्रोल फेकले आणि सिगरेटच्या लायटरने पेटवून दिले.

- Advertisement -

या घटनेत गंभीर जखमी झालेल्या चंद्रकांत पवार यांना सुरुवातीला वांगणीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात व पुढे उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबईच्या सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान पवार यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी कुळगाव पोलिसांनी निखिल गुरव याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. आता या गुन्ह्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमांचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच या गुन्ह्याचा तपास मुरबाड उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, यासंदर्भात अधिक माहितीसाठी कुळगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक निगडे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.


Maratha Reservation: ‘…तर कोणत्याही परिस्थितीत मी राजीनामा देणारच’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -