शिवसेना भवनाजवळ बर्निंग कार, कोहिनूर स्क्वेअरच्या कर्मचाऱ्यांमुळे अनर्थ टळला

Burning car near ShivSena Bhavan | ही गाडी कोणाची होती, ती केव्हा व कोणी पार्क केली आणि त्यामध्ये आग कशी काय लागली याबाबत स्थानिक पोलीस व अग्निशमन दलाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे.

dadar fire

Burning car near ShivSena Bhavan | मुंबई – दादर येथील शिवसेना भवनजवळ रस्त्यालगत एका चारचाकी सीएनजी सँट्रो टॅक्सी या गाडीने अचानक पेट घेतला. या पेटत्या गाडीतून स्फोटाचे आवाज आले. त्यामुळे भरदिवसा घडलेल्या या घटनेने सेनाभवन परिसरात खळबळ उडाली. सुदैवाने स्थानिक पोलिसांनी तत्परता दाखवत रस्त्यावरील वाहतूक व नागरिकांची ये-जा रोखून धरली. अग्निशमन दलाची यंत्रणा घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी व नजिकच्या कोहिनूर स्क्वेअरच्या स्टाफने त्यांच्याकडील अग्निप्रतिबंधक यंत्रणेचा वापर करून गाडीला लागलेली आग विझवली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

हेही वाचा – दादर येथील आर.ए. रेसिडेन्सी टॉवरमध्ये भीषण आग

प्राप्त माहितीनुसार, दादर (प.), एन. सी. केळकर मार्ग, शिवसेना भवन या ठिकाणी शिवसेनेचे मोठे नेते, पदाधिकारी आदींची नियमित ये – जा करीत असतात. या नेत्यांपैकी कोणाची अथवा अन्य कोणाची सीएनजी सँट्रो टॅक्सी ही गाडी पार्क करण्यात आली होती. दुपारी ३.४० वाजताच्या सुमारास या गाडीने अचानकपणे आग लागल्याने पेट घेतला. बघता बघता गाडीला लागलेल्या आगीतून स्फोटाचे आवाज ऐकायला मिळाले, असे नागरिकांचे म्हणणे होते. या गाडीला लागलेल्या आगीमुळे परिसरात खळबळ उडाली. त्याचवेळी नागरिकांनी गाडीला लागलेली आग बघायला मोठी गर्दी केली होती. मात्र स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमलेल्या नागरिकांना आग लागलेल्या गाडीपासून दूर सुरक्षित ठिकाणी लोटले.

तर या गाडीला लागलेल्या आगीची झळ नजिकच्या दुकानदारांना बसू नये म्हणून तेथील काही दुकाने बंद करण्यात आली. तसेच, रस्त्यावरील एका बाजूची वाहतूक रोखण्यात आली. नजिकच्या इमारतीमधील काही रहिवासी सुरक्षिततेच्या दृष्टीने इमारतीबाहेर आल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, गाडीला लागलेली आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी नजीकच्या कोहिनूर स्क्वेअरमधील कर्मचाऱ्यांच्या मदतीने तेथील अग्निप्रतिबंधक यंत्रणेचा वापर करून गाडीला लागलेल्या आगीवर काही अवधीतच नियंत्रण मिळविले. त्यासाठी सेनाभवन परिसरातील रस्त्यावरील दुतर्फा वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या काही अवधीतच अग्निशमन दलाची यंत्रणा घटनास्थळी आली. तत्पूर्वी घटनास्थळी युवासेना नेते, माजी मंत्री व आमदार आदित्य ठाकरे भेट दिल्याचे सांगण्यात आले.

मात्र, ही गाडी कोणाची होती, ती केव्हा व कोणी पार्क केली आणि त्यामध्ये आग कशी काय लागली याबाबत स्थानिक पोलीस व अग्निशमन दलाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे.