भाजपच्या भ्रष्टाचाररूपी रावणाचे दहन

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन

महापालिकेत सत्ताधारी भाजपने केलेले भ्रष्टाचार व घोटाळ्याच्या रावणाचे दसर्‍यानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मुंबई नाका येथे दहन करण्यात आले. नाशिक महापालिकेत कासवगतीने होत असलेली कामे व घोटाळ्यांची प्रतिकृती तयार करून तिचे दहन करण्यात आले.

रावण वध म्हणजेच सत्याचा असत्यावर विजय, अज्ञानावर ज्ञानाचा विजय असल्याचे प्रतिक मानले जाते. याच तत्वाच्या अनुषंगाने नाशिक महापालिकेतील सत्ताधारी भाजपने घोटाळे व कासवगतीने होत असलेली कामे, भाजपने जनतेच्या डोळ्यात केलेली धूळफेक या विविध बाबींची रावण प्रतिकृती तयार करण्यात आली. नाशिक महापालिकेतील महापौर, स्थायी समिती सभापती व सत्ताधारी नगरसेवक यांची महापालिकेत काम करण्याची क्षमता नसून महापालिका सत्ताधारी भाजप मोठमोठे घोटाळे करत आहे. तोट्यात जाणार्‍या बससेवेला सर्व पक्षीय विरोध असतानाही दत्तक बापाच्या हट्टापायी बससेवा सुरु केली. भाजपची सत्ता आल्यापासून मनपाची पत घसरली आहे. मनपाला क्रिसील रेटिंग एए देण्यात आली. घंटागाडीचा ठेका १७६ कोटीवरून ३५० कोटीवर नेण्यात आला. सफाई कर्मचारी ठेक्यातील भ्रष्टाचार उघड झाला. १९ कोटीचा पेस्ट कंट्रोल ठेका ३३ कोटीपर्यंत पोहोचला व नंतर ४६ कोटी करून ठेकेदारास भाजपने परस्पर मुदतवाढ दिली. शहरातील १ किमीच्या स्मार्ट रस्त्याची मुदत ६ महिने असताना त्यास पूर्ण होण्यास ३ वर्षाचा कालावधी लागला. यानंतर ठेकेदारास दंडमाफी करण्यात आली. गोदावरी प्रदूषण, शहरातील खड्डे, एलईडी घोटाळा, गोदाघाट सुशोभीकरण व पुरात वाहून गेलेले साहित्य अशा अनेक कामांमध्ये सत्ताधार्‍यांनी घोटाळे व भ्रष्टाचार केले असून सत्ताधार्‍यांच्या नाकर्तेपणाचा रावण जाळल्याचे युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले. यावेळी मध्य विधानसभा अध्यक्ष जय कोतवाल, पूर्व विभाग अध्यक्ष सागर बेदरकर, संतोष जगताप, किरण पानकर, डॉ. संदीप चव्हाण, राहुल कमानकर, अक्षय पाटील, सचिन मोगल, मिलिंद सोळंकी, संदीप चावला, शहाद अरब, अमोल पवार उपस्थित होते.