मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यानंतर तब्बल 12 दिवसंनी मुख्यमंत्री कोण हे समोर आले आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते कोणाला कोणते मंत्रिपद मिळणार याकडे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे आमदार आणि प्रमुख नेते संजय शिरसाट म्हणाले की, “लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. याबाबतची तारीख लवकरच समजेल.” अशी माहिती दिली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता गृहखाते कोणाकडे जाणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. (Cabinet Expansion of maharashtra will happen in few days says shivsena sanjay Shirsat)
हेही वाचा : Rajya Sabha : राज्यसभेत काँग्रेसच्या बाकाखाली सापडले नोटांचे बंडल; सभापतींचे चौकशीचे आदेश
“विशेष अधिवेशन झाल्यानंतर 11 किंवा 12 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे सुतोवाच स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. म्हणून आता जास्त कालावधी लागणार नाही. याबद्दल लवकरच घोषणा होईल. मंत्रिमंडळात कोण असेल किंवा कोण नसेल? याचा निर्णय त्या त्या पक्षांचे प्रमुख नेते घेतील. मंत्रिमंडळात कोण असेल? हे अधिवेशनाच्या एक दिवसाआधी कळेल.” अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली. तसेच, ते पुढे म्हणाले की, “विधानसभेत 232 जागांवर विजय महायुतीने मिळवला आहे. तर मंत्रिपदे ही एकूण 43 आहेत. यामध्ये थोडी कसरत ही होणारच आहे. अनेक ज्येष्ठ आमदार आहेत, काही अनुभवी आहेत. या सर्वांचा ताळमेळ बसवणे, हे एक मोठे आव्हान आहे. यासाठी एक वेगळे कौशल्य दाखवावे लागणार आहे. त्याआधारेच या मंत्र्यांची निवड करावी लागणार आहे.” असे विधान त्यांनी केले.
“नवीन सरकारची भूमिका ही सर्व जातीधर्माला सोबत घेऊन जाण्याची आहे. मग तो मराठा समाज असो किंवा ओबीसी असो किंवा कोणीही असो, सर्व समाजाला न्याय देण्याची आमची मानसिकता आहे. कोणत्याही समाजाला न्याय देताना दुसऱ्या समाजावर अन्याय होणार नाही, याची काळजी एकनाथ शिंदे यांनी नेहमीच घेतली आहे.” आरक्षणाच्या मुद्द्यावर संजय शिरसाट यांनी आपली भूमिका यावेळी स्पष्ट केली. तसेच, लाडक्या बहिणींना त्यांचे 1500 रुपये लवकरच मिळतील, असेदेखील त्यांनी यावेळी सांगितले.