घर महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यात 15 वर्षात फक्त 2 बैठका, 2016 नंतरच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीची सप्टेंबरमध्ये...

मराठवाड्यात 15 वर्षात फक्त 2 बैठका, 2016 नंतरच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीची सप्टेंबरमध्ये शक्यता

Subscribe

औरंगाबाद – मराठवाडा हा कायम दुष्काळवाडा, टँकरवाडा म्हणून ओळखला जातो. यंदाही मराठवाड्यात पुरेसा पाऊस झालेला नाही. मराठवाड्यातील प्रलंबित प्रश्न, विकास कामांचा आढावा आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून येथे मंत्रिमंडळ बैठकीची सातत्याने मागणी होत आहे. अखेर या बैठकीला मुहूर्त लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मराठवाड्यात गेल्या 15 वर्षांमध्ये फक्त दोन वेळा मंत्रिमंडळ बैठक झाली आहे. मराठवाड्याचे भूमिपूत्र दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात 2008 साली बैठक झाली होती. त्यानंतर 2016 मध्ये युतीकाळात तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये औरंगाबादला बैठक झाली होती. त्यानंतर सात वर्षांनी मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक होण्याचे संकेत मिळत आहेत.

- Advertisement -

तब्बल सात वर्षानंतर औरंगाबादमध्ये मंत्रिमंडळाची बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या दृष्टीने मराठवाड्यात नियोजन सुरु करण्यात आले आहे. मंत्रिमंडळ बैठक येत्या 16 सप्टेंबरला म्हणजे मराठवाडा मुक्ती दिनाच्या एक दिवस आधी होण्याची शक्यता आहे. याबद्दल शासनाकडून तोंडी निरोप मिळाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या आठवड्याच्या शेवटी नियोजनाचे अधिकृत पत्र मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मराठवाड्यात गेल्या सात वर्षांमध्ये मंत्रिमंडळाची बैठक झालेली नाही. यापूर्वी 4 ऑक्टोबर 2016ला औरंगाबादमध्ये मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. औरंगाबाद विभागीय आयुक्तालयाकडून मंत्रिमंडळ बैठकीसाठी जिल्हा निहाय नियोजनाला सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हात सुरु असलेल्या कामांचा आढावा, होऊ घातलेल्या कामांचे नियोजन, झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी झाली आहे का, या संबंधीची सर्व माहिती विभागीय आयुक्तांकडून मागवली जात आहे. त्यासोबतच विकास कामासाठीच्या निधीचीही माहिती मागवली गेली आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याने विकास योजनांसाठी प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : “कांद्यानंतर आता साखरेवरील निर्यात शुल्क वाढेल”, शरद पवारांनी व्यक्त केली भीती

17 सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे. यंदाचा मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी सोहळा आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन होत असल्याची माहिती आहे. मराठवाडा हैदराबादच्या निजामाच्या तावडीतून मुक्त झाल्यानंतर विनाअट महाराष्ट्रात सामील झाला होता. मराठवाड्याच्या विकासाकडे महाराष्ट्र सरकारने जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज होती, मात्र तसे झाले नसल्याचा आरोप मराठवाड्यातील सामाजिक  आणि राजकीय नेते सातत्याने करतात.  मराठवाड्यात यंदा पावसाने ओढ दिली आहे. आतापर्यंत मराठवाड्यात पावसाळ्यातील 50 दिवस कोरडे गेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर तहसीलदारांनी तालुक्याचा आढावा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच जिल्हा प्रशासनालाही सजग राहाण्याचे आदेश देण्यात आले आहे. विकास कामांचा आढावा विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांनी घेतला असून सातही जिल्ह्यांतून विकास कामांसंबंधीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

- Advertisment -