कॅगकडून मोदी सरकारच्या योजनांमधील भ्रष्टाचार उघड करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसंच, कॅगवर आता इडीच्या धाडी घालणार का? असा खोचक सवालही राऊतांनी केला, अन् मोदी सरकारवर टीका केली. यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कॅगचे ताशेरे म्हणजे भ्रष्टाचार नाही, असं उत्तर दिलं आहे. (CAGs crackdowns are not corruption Said by BJP leader Chandrashekhar Bawankules on Sanjay Raut Allegations on Modi Government pup )
नेमकं काय म्हणाले बावनकुळे?
कॅगचा जो अहवाल असतो, कॅग त्यात अनेक त्रुटी ऑडिटनुसार काढत असतं. उदाहरणार्थ, एखादा रस्ता 18 लाखांचा बनवला. त्यावरून 50 टनचा ट्रक गेला की तो रस्ता तुटतो. त्यामुळे 100 टनचा ट्रक गेला तरीही रस्ता तुटू नये म्हणून तर का रस्त्याचं बांधकाम करण्यात आलं असेल, तर खर्च जो आहे तो वाढणार असल्याचं, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. एखाद्या कामाला जास्त पैसे लागले असतील तर त्याचं उत्तर जे आहे, ते त्या त्या विभागातील जबाबदार व्यक्ती देत असतात, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केलं. ऊर्जाखात्यात जेव्हा मी मंत्री होतो तेव्हासुद्धा कॅगने काही त्रुटी दाखवल्या होत्या. यावर कॅगला योग्य ते उत्तर दिल्यानं ते आक्षेप रद्द व्हायचे. त्यामुळे आता कॅगने जे ताशेरे ओढले आहेत असं म्हटलं जातंय तो भ्रष्टाचार नाही, त्याला योग्य अभ्यासपूर्वक उत्तर दिल्यास ते आक्षेप मागे घेतले जातात, असंही बावनकुळे म्हणाले.
यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरही भाष्य केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करतील, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. तसंच, हिवाळी अधिवेशन नागपुरला होण्याआधीच हा विस्तार व्हावा, अशी मागणी मी करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
तसंच, हंसराज अहिर हे लोकसभेसाठी इच्छुक आहेत आणि त्यांनी पंतप्रधानांची भेटही त्यांनी घेतली. त्याआधी अमित शहा आणि जेपी नड्डांचीही त्यांनी भेट घेतली. यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, हंसराज अहिर हे वरिष्ठ नेते आहेत. परंतु, निवडणुकीबाबत कोणाला उमेदवारी द्यायची हा निर्णय केंद्रीय संसदीय मंडळ घेत असतं, असं बावनकुळे यांनी सांगितलं.