घरमहाराष्ट्रट्विटरवरून शिक्षणमंत्री हटवा मोहीम; पालक आक्रमक

ट्विटरवरून शिक्षणमंत्री हटवा मोहीम; पालक आक्रमक

Subscribe

पालकांच्या समस्यांबाबत वर्षा गायकवाड स्पष्ट निर्णय घेत नसल्याने त्यांना या पदावरून हटवण्यासाठी राज्यातील पालकांनी ट्विटरवरून ‘शिक्षणमंत्री हटाव’ मोहीम हाती घेतली आहे.

शाळा सुरू करण्याची घाई, शुल्कमाफीऐवजी टप्याटप्प्याने वसूल करण्याचा निर्णय, शुल्क विनियम कायद्यातील सुचवलेले बदल लागू करण्याकडे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. पालकांच्या समस्यांबाबत वर्षा गायकवाड स्पष्ट निर्णय घेत नसल्याने त्यांना या पदावरून हटवण्यासाठी राज्यातील पालकांनी ट्विटरवरून ‘शिक्षणमंत्री हटाव’ मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी सुरू असलेल्या मतदानाला राज्यातील पालकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

कोरोनामुळे सध्या शाळा बंद असल्याने ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. ऑनलाईन शिक्षण सुरू असतानाही शाळांकडून मोठ्या प्रमाणात शुल्कासाठी पालकांच्या मागे ससेमिरा लावण्यात येत आहे. शुल्क न भरणार्‍या विद्यार्थ्यास ऑनलाईन वर्गात घेण्यात येत नाही. त्यामुळे हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. यासंदर्भात पालकांनी वारंवार शिक्षणमंत्र्यांकडे व शिक्षण विभागाकडे तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. अन्य राज्यांमध्ये सरकारने शुल्क कपात करून पालकांना दिलासा दिला आहे, मात्र महाराष्ट्रात शिक्षणमंत्र्यांकडून १०० टक्के शुल्क टप्याटप्प्याने भरण्यास सांगण्यात येत आहे. लॉकडाऊनमुळे नोकरी, व्यवसाय ठप्प झाल्याने घरखर्च चालवणे अवघड झाले असताना शाळांकडून अतिरिक्त शुल्क आकारून लुट करत असल्याचा आरोप पालकांकडून करण्यात येत आहे.

- Advertisement -

एमआयटी पॅरेंट्स पुणे यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या ‘शिक्षणमंत्री हटाव’ मोहीमेला पालकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. ट्विटरवर पालकांकडून शिक्षणमंत्र्यांविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये पालकांच्या किती तक्रारींवर ताईंनी आतापर्यंत कारवाई केली. राज्यमंत्र्यांनी निर्णय घ्यायचा आणि त्याविरोधात शाळांनी ताईंकडे धाव घ्यायची, हा चुकीचा पायंडा पाडत आहेत. कायद्याचे उल्लंघन केलेल्या शाळांसंदर्भातील पुरावे सादर करूनही शिक्षणमंत्र्यांनी एकाही शाळेवर कारवाई केलेली नाही. अशा अनेक मते पालकांनी ट्विटरवर व्यक्त करत आपला संताप व्यक्त केला आहे. शिक्षणमंत्री केवळ आश्वासनेच देत आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी त्यांना पदावरून हटविण्यासाठी ट्विटरवर मोहीम उघडली आहे. या मोहिमेला पालकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याने शिक्षण मंत्रांविरोधातील संताप असल्याचे दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -