घरमहाराष्ट्रपुणेकसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार थंडावला; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला प्रचार

कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार थंडावला; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला प्रचार

Subscribe

पुणे – सत्ताधारी शिवसेना-भाजप युती आणि विरोधी पक्षातील महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शुक्रवारी थंडावला. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी पदयात्रा, रोड शोवर भर देत मतदारांना मतदानाचे आवाहन केले. या पोटनिवडणुकीचा प्रचार युती आणि आघाडीतील आरोप-प्रत्यारोपांनी गाजला. निवडणूक प्रचार संपल्याने उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आता रविवारी होणार्‍या मतदानाच्या तयारीला लागले आहेत.

भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अनुक्रमे कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी २६ फेब्रुवारीला मतदान होत आहे. या पोटनिवडणुकीत भाजपने कसबा पेठमधून हेमंत रासने, तर चिंचवडमधून अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) या महाविकास आघाडीने भाजपविरोधात उमेदवार दिले आहेत. कसब्याची जागा काँग्रेस लढत असून येथून रवींद्र धंगेकर, तर चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे रिंगणात आहेत.

- Advertisement -

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर प्रथमच शिवसेना-भाजप युती आणि महाविकास आघाडी या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आमने-सामने उभे ठाकले आहेत. त्यामुळे पोटनिवडणुकीत दोन्ही बाजूंनी जोर लावला आहे. भाजपने या पोटनिवडणुकीत विशेष मेहनत घेतली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे बहुतांश मंत्री, पदाधिकारी, खासदार, आमदार झाडून प्रचारात उतरले होते. याशिवाय भाजपने मित्रपक्षाचे नेते रामदास आठवले, सदाभाऊ खोत यांनाही प्रचारात उतरवले होते. कसबा पेठमध्ये तर आजारी असलेले खासदार गिरीश बापट यांनीही प्रचार केला. फडणवीस यांनी शेवटच्या दोन दिवसांत प्रचारसभा आणि रोड शोवर भर दिला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कसब्यासाठी भाजपला ठाण्यातून रसद पुरवली. शिवसेनेचे ठाण्यातील अनेक नेते कसबा पेठमध्ये ठाण मांडून होते. खुद्द एकनाथ शिंदे यांनीही दोन्ही ठिकाणी युतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा तसेच रोड शो केला.

या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे नेते हातात हात घालून उतरल्याचे चित्र दिसले. आघाडीच्या उमेदवारांसाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील आदींनी प्रचार केला. शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी आघाडीच्या उमेदवारांसाठी रोड शो आणि सभा घेतल्या, तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजमाध्यमातून मतदारांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सहभाग घेतला. या पार्श्वभूमीवर आता कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीतील मतदानाची आणि निकालाची उत्सुकता वाढली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -