देवेंद्र फडणवीस बनणार केंद्रीय अर्थमंत्री? आतातरी अर्थव्यवस्थेला गती मिळेल का?

devendra fadnavis and nirmala sitharama
विधानसभेचे विरोधी पक्षनेते केंद्रीय अर्थमंत्री होणार?

सत्ता काळात स्वपक्षीयांचे पंख छाटल्याने पक्षात देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात नाराजी असून, येत्या काळात ही नाराजी अजून उफाळून येऊ नये आणि महाराष्ट्रामध्ये भाजपचे नुकसान होऊ नये. म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत पाठवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांना राज्यसभेवर पाठवून त्यांच्याकडे केंद्रीय अर्थ मंत्रीपदाची जबाबदारी द्यावी, असे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटत असून, याबाबत दिल्लीत एक बैठक झाल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे.

गडकरींची ताकद कमी करण्याची मोदींची खेळी

दरम्यान राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत जरी काही नेत्यामध्ये नाराजी असली तरी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुडबुकमध्ये फडणवीस आहेत. त्यातच नरेंद्र मोदी आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्यामध्ये फारसे पटत नसल्याने देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात आणून त्यांच्याकडे महत्वाची जबाबदारी देऊन गडकरींचे महत्व कमी करून एका दगडात दोन पक्षी मारण्याचा मोदींचा प्रयत्न आहे. तसेच अर्थमंत्री निर्मला सिरारामन यांच्याबाबतही मोदींचे मत फारसे चांगले नसल्याने त्यांना केरळची जबाबदारी देऊन त्यांच्याकडील वित्त खाते फडणवीस यांच्याकडे देण्याबाबत प्राथमिक चर्चा देखील झाल्याची माहिती मिळत आहे.

हे वाचा – देवेंद्र फडणवीसांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी?

तर सुधीर मुनगंटीवार होणार विरोधीपक्ष नेते

सगळ्यात महत्वाचे म्हणजे जर देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर त्यांच्याकडे असलेल्या विधानसभा विरोधीपक्ष नेते पदाची जबाबदारी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. त्यातच राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या सोबत घेतलेला पंगा यामुळे भाजपला राज्यात सर्वाधिक जागा जिकूनही सत्ता स्थापन करता आली नाही. त्यामुळेच राज्यात असलेली फडणवीस यांच्याबद्दलची नाराजी आणि मोदींना गडकरींचा असलेला अडसर यामुळेच फडणवीस यांना केंद्रात पाठवले जाऊ शकते.

आठवलेंचा पत्ता कट की आणखी कुणाचा?

महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेल्या ७ सदस्यांचा कार्यकाळ संपत असून, त्याजागी राज्यातून कुणाला पाठवायचं, याची खलबतं सर्वपक्षीय पातळीवर होऊ लागली आहेत. या सातपैकी भाजपकडून ३ जण विजयी होतील अशी गणितं जुळून आली आहेत. भाजपकडून विद्यमान राज्यसभा सदस्य अमर साबळे, अजय संचेती, उदयनराजे भोसले यांची नावं देखील चर्चेत आहेत. त्यासोबतच, रामदास आठवलेंची टर्म देखील संपत असून त्यांचंही पुनर्वसन भाजपला करावं लागणार आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांना राज्यसभेत पाठवायचं झाल्यास यापैकी कुणाचातरी पत्ता कट होण्याची शक्यता आहे.