पिंपरी चिंचवड: सोसायटीत खेळणाऱ्या ९ वर्षांच्या मुलाला कारने चिरडले, थरार सीसीटीव्हीत कैद

मुलाला एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर आहे

car crashed on 9-year-old child in pimpri chinchwad incident caught in cctv
पिंपरी चिंचवड: सोसायटीत खेळणाऱ्या ९ वर्षांच्या मुलाला कारने चिरडले, थरार सीसीटीव्हीत कैद

पिंपरी चिंचवडमधून (pimpri chinchwad ) एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या एका ९ वर्षाच्या लहान मुलाला कारने चिरडल्याची (car crashed on 9-year-old child)  धक्कादायक घटना घडली आहे. सोसाईटीच्या आवारात संध्याकाळच्या वेळेस मुले खेळत असताना अचानक भरधाव आय टेन कार आली आणि खेळत असलेल्या मुलाला चिरडले. इनोश प्रदीप कबस असे त्या मुलाचे नाव असून या अपघातात तो गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर आहे. हा संपूर्ण थरार सोसायटीच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून मुलाला चिरडणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

ही घटना आहे पिंपरी चिंचवडच्या पिंपळे सौदागर येथील एका सोसायटीमधील. सोनल देशपांडे असे इनोश या मुलाला चिरडणाऱ्या महिलेचे नाव आहे. महिलेविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रदीप प्रवर्तिक कसब यांनी महिलेविरोधात तक्रार दाखल केली आहे. या घटनेनंतर सोसायटीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर येथील साई वास्तू हौसिंग को. सोसायटीच्या आवारात संध्याकाळच्या वेळेस लहान मुले खेळत होती. आऊट गेटच्या आधी इनोश खेळता खेळता खाली बसला आणि तितक्यात सोनल देशपांडे यांची भरधाव आय टेन कार आली आणि खाली बसलेल्या इनोश तिने चिरडले. त्यानंतर सोसायटीच्या आवारातील माणसांनी इनोशला बाहेर काढले आणि तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मुलाला चिरडणाऱ्या सोनल देशपांडे या महिलेला पोलिसांनी अटक केली असून गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे तिने सांगितले.


हेही वाचा – सिंधुदुर्ग किल्ला महाराजांनी बांधला, कोणतरी बोलेलं मी बांधला, मुख्यमंत्र्यांचा राणेंवर पलटवार