घरमहाराष्ट्रबांगलादेशी महिलेच्या पासपोर्ट प्रकरणी अतिरिक्त पोलीस महासंचालक देवेन भारतींविरोधात गुन्हा दाखल

बांगलादेशी महिलेच्या पासपोर्ट प्रकरणी अतिरिक्त पोलीस महासंचालक देवेन भारतींविरोधात गुन्हा दाखल

Subscribe

अतिरिक्त पोलीस महासंचालक देवेन भारती यांच्यासह माजी सहाय्यक पोलीस आयुक्त दिपक फटांगरे, रेश्मा खान यांच्याविरोधात देखील गुन्हा दाखल झाला आहे.

मुंबई शहरात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिक महिलेवर तक्रार करूनही काहीही कारवाई न केल्याप्रकरणी अतिरिक्त पोलीस महासंचालक देवेन भारती, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त दिपक फटांगरे, बांगलादेशी महिला रेश्मा खान यांच्याविरुद्ध मालवणी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्यांचा तपास आता गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाकडे सोपविण्यात आला आहे. तत्कालीन  मुंबई कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त देवेन भारती यांच्या आदेशावरून रेश्मावर गुन्हा दाखल झाला नव्हता, असा आरोप तक्रारदार माजी पोलीस निरीक्षक दिपक कुरुळकर यांनी केला आहे. या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला असला तरी याबाबत काहीही माहिती देण्यास नकार दिला आहे.

चार वर्षांपूर्वी दिपक कुरुळकर हे गुन्हे शाखेच्या आय शाखेत पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. यावेळी त्यांनी रेश्मा खानला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तिच्याकडे पोलिसांना एक पासपोर्ट सापडला होता. या पासपोर्टसाठी तिने सादर केलेले सर्व कागदपत्रे बोगस होती. ती बांगलादेशी नागरिक होती, तरीही तिने भारतीय नागरिक असल्याचे बोगस पुरावे गोळा केले होते. तिच्याविरुद्ध भक्कम पुरावे गोळा केल्यानंतर दिपक कुरुळकर यांनी मालवणी पोलिसांना गुन्हा करून तिच्याविरुद्ध ठोस कारवाई करण्याची विनंती केली होती. यावेळी दिपक फटांगरे हे मालवणी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते.

- Advertisement -

या तक्रारीनंतरही दिपक फटांगरे यांनी काहीही कारवाई केली नव्हती. काही दिवसांनी त्यांनी मालवणी पोलिसांकडे चौकशी करून त्यांच्या अर्जानंतर रेश्माविरुद्ध काय कारवाई झाली याबाबत विचारणा केली होती. यावेळी त्यांना वरिष्ठांच्या आदेशावरून ही कारवाई झाली नसल्याचे समजले. अधिक चौकशीअंती त्यांना, त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचे प्रमुख असलेले सहपोलीस आयुक्त देवेन भारती यांनीच मालवणी पोलिसांना तसे आदेश दिल्याचे समजले होते. आय शाखेत कार्यरत असताना त्यांना देवेन भारती यांनी बोलावून या प्रकरणात जास्त लक्ष घालू नकोस असेही बजाविले होते.
निवृत्तीनंतर त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा सोडला नव्हता. माहितीच्या अधिकारात त्यांनी पुन्हा ही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना चार वर्षांनंतरही या प्रकरणात मालवणी पोलिसांनी काहीच कारवाई केली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी मालवणी पोलिसांत लेखी अर्जाद्वारे तक्रार करून देवेन भारती, दिपक फटांगरे आणि रेश्मा खान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची विनंती केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मालवणी पोलिसांनी या तिघांविरुद्ध बोगस दस्तावेज सादर करून फसवणूक करणे, पासपोर्ट कायदा कलम तसेच विदेशी नागरिक कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाकडे सोपविण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्याने देवेन भारती आणि दिपक फटांगरे यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -