मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना ४ दिवसांची सीबीआय कोठडी

ED summons ex-Mumbai Police Commissioner Sanjay Pandey in NSE co location case

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE)फोन टॅपिंग प्रकरणी सीबीआयने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक केली आहे. मागील काही दिवसांपासून संजय पांडे हे न्यायालयीन कोठडीत होते. नॅशनल स्टॉक एक्सचेंज फोन टॅपिंग प्रकरणी त्यांना ईडीने अटक केली होती. परंतु आज त्यांना दिल्ली न्यायालयात हजर केले असता दिल्ली न्यायालयाने संजय पांडेंना ४ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.

१४ जुलै रोजी गुन्हा दाखल

एनएसईचे माजी सीईओ रवी नारायण हे देखील ईडीच्या ताब्यात आहेत. एनएसई घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरण आणि एक्सचेंज कर्मचाऱ्यांचे फोन बेकायदेशीर टॅप केल्याप्रकरणी त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. ईडीने १४ जुलै रोजी नारायण, माजी एनएसई प्रमुख चित्रा रामकृष्ण आणि मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या विरोधात पीएमएल अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने या तिघांविरुद्ध सर्वात प्रथम गुन्हा दाखल केला होता.

संजय पांडेंवर नेमके आरोप काय?

संजय पांडे यांनी आयआयटी कानपूरमधून कंप्यूटर सायन्समध्ये पदवी घेतली आहे. त्यानंतर ते १९८६ बॅचचे आयपीएस ऑफिसर असून ३० जून २०२२ रोजी ते सेवानिवृत्त झाले. संजय पांडे पोलीस सेवेत दाखल होण्याआधी त्यांची आय सिक्युरिटी ही एक आयटी कंपनी होती. या आयटी कंपनीकडून विविध कंपन्यांचं ऑडिट केलं जायचं. याच कंपनीवर २०१० ते २०१५ या कालावधीत नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे सिक्युरिटी ऑडिट करण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

यादरम्यान नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये को लोकेशन घोटाळा झाल्याचा आरोप ईडीने केला आहे. याप्रकरणी तपास यंत्रणांनी अलीकडेच राष्ट्रीय शेअर बाजाराच्या तत्कालीन सीएमडी चित्रा रामकृष्णन आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक केली. दरम्यान सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर आता ईडीने देखील मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे सिक्युरिटी ऑडिट करण्यासाठी संजय पांडे यांच्या कंपनीला कोट्यवधी रुपये देण्यात आले होते. मात्र ऑडिटच्या आडून त्यांच्या कंपनीने नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या कर्मचाऱ्यांचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप केला जात आहे. ईडीने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना निवृत्तीनंतर लगेच ३० जून रोजी चौकशीसाठी बोलावले होते.

निवृत्ती आणि अटक 

मुंबई पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी संजय पांडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे संचालक होते. त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक पदाची जबाबदारी सरकारने सोपवली. आपीएस रजनीश सेठ यांना महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक पद मिळाल्यानंतरही जबाबदारी त्यांच्याकडून काढून घेण्यात आली. त्यानंतर ते मुंबईचे पोलीस आयुक्त झाले. १९८६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी संजय पांडे मुंबईचे ७६ वे पोलीस आयुक्त होते. त्यांनी हा पदभार आयपीएस हेमंत नागराळे यांच्याकडून घेतला होता. ३० जून रोजी पोलीस सेवेतून निवृत्त झाल्यानंतर १९ जुलैला त्यांना अटक करण्यात आली.


हेही वाचा : फोन टॅपिंग प्रकरण: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना 9 दिवसांची ईडी कोठडी