अनिल देशमुखांच्या घरावर CBI चा छापा; मुलगा आणि सुनेविरोधात अटक वॉरंट?

former home minister anil deshmukh

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील घरावर सीबीआयने छापा मारला आहे. सकाळी सात वाजता सीबीआयचे सात अधिकारी घरी पोहोचले. दरम्यान, अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख आणि सुनेविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आल्याची माहिती देखील मिळतेय. त्यामुळे देशमुख यांचा मुलगा आणि सुनेला अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, सीबीआयने अद्याप कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

सीबीआयचे अधिकारी आज सकाळी अनिल देशमुख यांच्या घरी पोहोचले. सोबत अधिकाऱ्यांनी देशमुखांचा मुलगा आणि सुनेविरोधात अटक वॉरंट घेऊन आल्याची माहिती आहे. मात्र घराबाहेर सध्या कुठलीही हालचाल नसल्याची माहितीही समोर येत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घराबाहेर घोषणाबाजी करत होते.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसूल करण्याचे आदेश दिले होते, असा आरोप केला होता. त्यामुळे अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणा देशमुखांच्या मागे लागल्या असून देशमुखांच्या घरी आतापर्यंत ईडीने, सीबीआयने आणि आयकर विभागाने देखील अनेकवेळा छापेमारी केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी देशमुखांच्या संबंधित साई शिक्षण संस्थेच्या खात्यात चार कोटी रुपये जमा झाल्याने ते अजून अडचणीत आले आहेत. तसंच वारंवार नोटीस देऊन ईडी चौकशीला उपस्थित राहत नसल्याने देशमुख यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस बजावण्यात आली आहे. दिड-दोन महिन्यांपासून ते अज्ञात स्थळी आहेत.

दरम्यान, ईडीने हतबल होऊन न्यायालयात देशमुख चौकशीला हजर राहत नसल्याने त्यांना हजर राहण्याचे आदेस देण्याची विनंती केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांना समन्स जारी करून ईडीच्या चौकशीसाठी का हजर राहत नाही? याबाबत विचारणा केली होती. मात्र, अद्यापही अनिल देशमुख नेमके कुठे आहेत? याचा थांगपत्ता लागलेला नाही. आता सीबीआयचे अधिकारी थेट त्यांच्या मुलाला आणि सूनेला अटक करण्यासाठी पोहोचल्याची माहिती आहे.