(CBSE New rules) नवी दिल्ली : पुढील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात परीक्षांचा हंगाम सुरू होईल. याच पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) नियमांमध्ये बदल केले आहेत परीक्षांमध्ये मोबाईल फोन तसेच अन्य इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. परीक्षा सुरू असताना एखादा विद्यार्थी मोबाईल फोन किंवा अन्य कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणासह पकडला गेला तर त्याला दोन वर्षांसाठी परीक्षेला बसण्यास बंदी घातली जाईल. सध्या, अशा प्रकरणांमध्ये एक वर्षासाठी परीक्षेला बसण्यास बंदी आहे. एवढेच नाही तर, अफवा पसरवणे देखील अनुचित प्रकार समजला जाईल, असे सीबीएसईने स्पष्ट केले आहे.
एखाद्या विद्यार्थ्याने परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरले किंवा त्याच्याकडे ठेवले तर तो केवळ या वर्षीच नव्हे तर पुढच्या वर्षीही परीक्षेला बसू शकणार नाही, अशी माहिती सीबीएसई परीक्षा नियंत्रक डॉ. संयम भारद्वाज यांनी दिली. गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर परीक्षेबद्दल खोट्या अफवा पसरवल्याच्या घटना समोर येत आहेत. असले प्रकार रोखण्यासाठी सीबीएसईने सोशल मीडियावर परीक्षेबद्दल अफवा पसरवणे देखील अनुचित हेतू संबंधीच्या नियमांत समाविष्ट केले आहे. गैरप्रकार घडू नये, योग्य देखरेख आणि पारदर्शकता राखण्यासाठी परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवले जाणार आहेत.
हेही वाचा – Bombay HC : मशिदींच्या भोंग्यांवरील याचिकेवर न्यायालयाचा हा महत्त्वाचा निर्णय, सविस्तर वाचा
सीबीएसई दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचे प्रवेशपत्र लवकरच जारी करण्यात येईल. सीबीएसईकडून cbse.gov.in या वेबसाइटवर विद्यार्थ्यांसाठी प्रवेशपत्र दिले जाईल. यानंतर, शाळांचे प्रमुख विद्यार्थ्यांच्या क्रेडेंशिअल्सचा वापर करून वेबपोर्टलवरून हे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील. नियमित विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीनंतर शाळेतून घ्यावे लागेल.
सीबीएसईतर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी 2025पासून घेण्यात येणार आहेत. दहावीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 दरम्यान घेतली जाईल. तर, बारावीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 4 एप्रिल 2025 या कालावधीत होईल. यावर्षी सुमारे 44 लाख विद्यार्थी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत बसण्याची अपेक्षा आहे. (CBSE New rules: Students are banned from using mobile phones)
हेही वाचा – Mumbai BMC : इमारतीवर नवीन बांधकाम करणार्यांवर कारवाई करा, पालिकेने दिले आदेश