घरमहाराष्ट्रडोंबिवलीच्या स्मशानभूमीत ‘तो’ २४ तास वावरतोय

डोंबिवलीच्या स्मशानभूमीत ‘तो’ २४ तास वावरतोय

Subscribe

पुण्याचे काम, मदतीची भावना !

स्मशानभूमी म्हटले की अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. भीती वाटते, पण डोंबिवलीतील नितीन बनसोडे हा १८ वर्षांचा तरुण २४ तास स्मशानभूमीतच काम करतो. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल. स्मशानभूमीच्या साफसफाईचा ठेका नितीनच्या वडिलांनी घेतला आहे. त्यामुळे वडिलांना तो कामात मदत करतो. डोंबिवलीतील शिवमंदिर मोक्षधाम या स्मशानभूमीत नितीन एक दोन नव्हे तर २४ तास वावरत असतो. नातेवाईकांनी मृतदेहाला अग्नी दिल्यानंतर त्याचे काम सुरू होते ते त्यांना अस्थी देईपर्यंत! ओठावर मिशीही न फुटलेल्या नितीनची ही हिंमत सर्वांनाच चकीत करते.

डोंबिवली पूर्वेतील शिवमंदिर मोक्षधाम स्मशानभूमीतील साफसफाईच्या कामाचा ठेका हा सुनील बनसोडे यांनी घेतला आहे. नितीन हा त्यांचा मुलगा. गेल्या वर्षभरापासून नितीन वडिलांना या कामात मदत करीत आहे. स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर नातेवाईक निघून जातात. मात्र, त्या मृतदेहाला व्यवस्थितपणे अग्नि लागला आहे की नाही, नसेल तर अग्नि प्रज्वलित करण्याचे काम नितीन करतो. मृतदेहावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर अस्थी नातेवाइकांना काढून देण्याचे कामही तो करतो. तसेच स्मशानभूमीची सर्व साफसफाईची कामे नितीन स्वत: करीत असतो. स्मशानभूमीत मृतदेह कधीही येतात. दिवसाला पाच- सहा तर कधी कधी तर दहा मृतदेह येत असतात. परदेशातूनही मृतदेह येतात. रात्री अपरात्री कधीही मृतदेह येतात. त्यामुळे नितीन हा दिवस- रात्र २४ तास स्मशानातच असतो. स्मशानातच तो जेवतो आणि झोपतो. स्मशानात भूत वगैरे असतात असे बोलले जाते, पण मला तसं काहीच जाणवलं नाही आणि मला कधीही भीती वाटली नाही. त्यामुळे या सगळ्या चुकीच्या कल्पना आहेत, असे नितीन सांगतो. हे काम करायला मला भीती आणि कसलीच लाज वाटत नाही. कारण हे पुण्याचे काम आहे, असे वडील नेहमी सांगतात असेही नितीन म्हणतो.

- Advertisement -

डोंबिवलीतील आयरे गाव परिसरात नितीन आई वडील आणि छोटी बहीण अशा परिवारासह राहतो. त्याचे दहावीपर्यंतच शिक्षण झाले आहे. कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताची असल्याने त्याला पुढे शिकता आले नाही. नितीनला लहान बहीण असून, ती आठवीत शिकत आहे. नितीनला टॅट्यू काढण्याची आणि बी- बॉईज डान्सची खूप आवड आहे. एकेदिवशी टॅट्यूची कला शिकण्यासाठी तो घरातून गोवा आणि नाशिकला पळून गेला हेाता. तिथून तो टॅट्यू काढण्याची कला शिकून आला, पण टॅट्यू काढण्याची मशीन खूप महाग असल्याने ती घेऊ शकत नाही, असे नितीन सांगतो. त्यामुळे त्याला त्याच्या कलेला मुरड घालावी लागली. वडील कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर स्मशानभूमीतील सर्व कामे नितीन हा एकटाच करतो. वडिलांना कामात मदत करीत असल्याने त्यांच्याकडूनही नितीनच्या कामाचे कौतुक होते. तसेच इथे येणारे लोकही त्याचे कौतुक करतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -