उष्माघातामुळे केंद्रही चिंतेत, गाईडलाईनचे पालन करण्याच्या सूचना

राज्यात उष्णतेचा पारा सतत वाढत असून गेल्या दोन महिन्यांत उष्माघातामुळे 25 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठ वर्षांतील उष्माघातामुळे झालेली ही उच्चांकी मृत्यू नोंद आहे. आतापर्यंत राज्यात 374 लोकांना उष्माघाताची बाधा झाली आहे. उष्माघाताच्या वाढत्या संकटामुळे केंद्र सरकारने चिंता व्यक्त करीत राज्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात राज्यांनी केंद्र सरकारच्या गाईडलाईन्सचे पालन करून नॅशनल अ‍ॅक्शन प्लानवर लक्ष केंद्रित करण्याच्या दोन महत्त्वाच्या सूचना केंद्राने केल्या आहेत.

विदर्भातील उन्हाचा पारा 45 अंशांच्या पुढे गेला आहे. राज्यातील सर्वाधिक म्हणजे तब्बल 44 टक्के मृत्यू हे नागपूरमध्ये झालेत. नागपुरात आतापर्यंत 295 लोकांनी उष्माघातामुळे आपले प्राण गमावले आहेत. यातील गेल्या दोन महिन्यांतील मृतांची संख्या 11 वर आहे. जळगावात 4 जणांचा बळी गेला आहे. उष्माघातामुळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणार्‍यांची संख्यादेखील मोठी आहे. अशा परिस्थितीत विदर्भासह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात नागरिकांना तीव्र उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. केंद्र सरकारने जारी केलेल्या सूचनांनुसार प्रत्येक राज्यातील आरोग्य मंत्रालयांनी उष्माघातासंदर्भात नियमावली तयार करावी. आरोग्य सुविधा वाढवाव्यात. उष्माघाताशी संबंधित औषधांचा पुरेसा साठा तयार ठेवावा. यात सलाईन, आईस पॅक, ओआरएस, पेयजल यांचा पुरेसा पुरवठा करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य सचिवांच्या पत्रानुसार आयडीएसपीचा हा दैनंदिन देखरेख अहवाल राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रासोबत सामायिक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि NCDC द्वारे राज्यांसह सामायिक केल्या जाणार्‍या दैनंदिन उष्णतेच्या सूचनांवरून पुढील तीन-चार दिवसांसाठी उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्याचे आरोग्य विभाग, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि तळागाळातील कामगारांना उष्णतेबद्दल संवेदनशील बनवावे लागणार आहे, तसेच त्यांची क्षमता वाढवण्याचे प्रयत्न सुरू ठेवावे लागतील, असेही केंद्रीय आरोग्य सचिव भूषण यांनी म्हटले आहे. उन्हाळ्यात उद्भवणार्‍या आजारांना तोंड देण्यासाठी आरोग्य विभागाला उष्णतेचे आजार, त्याचे लवकर निदान आणि व्यवस्थापन याबाबतची तयारी अधिक तीव्र करावी लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे.