पुणे : सध्या पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोम अर्थात GBS या आजाराची मोठ्या प्रमाणात लागण झाली आहे. जीबीएस हा आजार आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करतो. यानंतर रोग प्रतिकारक शक्ती आपल्याच निरोगी पेशींवर हल्ला करतात. थोडे इन्फेक्शन झाले असले तरी याची लागण होऊ शकते. मुलांपासून वृद्धांपर्यंत या आजाराची लक्षणे आढळून आली असून दिवसेंदिवस लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. रविवारी (26 जानेवारी) या आजारामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यानंतर आता केंद्र सरकारने स्थानिक प्रशासनाला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. (Central government will help local administration in case of Guillain-Barré syndrome)
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने महाराष्ट्रातील पुणे येथे गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या संशयास्पद आणि खात्री पटलेल्या रुग्णांच्या संख्येतील वाढ लक्षात घेऊन सार्वजनिक आरोग्य उपाययोजना आणि व्यवस्थापनात राज्य आरोग्य प्रशासनाला मदत करण्यासाठी एक उच्च-स्तरीय बहु-शाखीय पथक नियुक्त केले आहे. महाराष्ट्रासाठीच्या केंद्रीय पथकात राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र, दिल्ली, निम्हान्स बेंगळुरू, पुणे येथील आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागीय कार्यालय आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) मधील सात तज्ज्ञांचा समावेश आहे.
हेही वाचा – Anjali Damania : मुंडे-कराडचे आर्थिक संबंध, दमानियांनी अजित पवारांना दिले पुरावे
एनआयव्ही, पुणे येथील तीन तज्ज्ञ आधीच स्थानिक प्रशासनाला मदत करत असून आता केंद्रीय पथकही दाखल झाले आहे. हे पथक राज्याच्या आरोग्य विभागांबरोबर एकत्रितपणे काम करतील. तसेच प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेऊन सार्वजनिक आरोग्य उपाययोजनांची शिफारस करतील. याशिवाय केंद्रीय आरोग्य मंत्रालय परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे आणि राज्याबरोबर समन्वय साधून सक्रिय पावले उचलत आहे.
जीबीएस रुग्णांची संख्या 101 नव पोहचली
दरम्यान, आठवड्याभरातच पुण्यातील गुलेन बॅरी सिंड्रोमची रुग्णसंख्या 101 वर पोहचली आहे. एकूण रुग्णांपैकी 68 पुरुष आणि 33 महिला आहेत. यातील 16 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे पुण्यात एकाच दिवसांत 28 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे रुग्ण आढळून आलेल्या परिसरात आरोग्य विभागाकडून 25 हजार 578 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
हेही वाचा – Manoj Jarange : आम्ही दहशतवादी नाही, पंकजा मुंडेंच्या भेटीवर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया