घरमहाराष्ट्रबाळासाहेब ठाकरेंनी दिली होती औरंगाबादचे संभाजीनगर करण्याची घोषणा

बाळासाहेब ठाकरेंनी दिली होती औरंगाबादचे संभाजीनगर करण्याची घोषणा

Subscribe

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये झालेल्या ऐतिहासिक सभेत शहराचे नामांतर संभाजीनगर करण्याची घोषणा केली होती

मुंबई – अखेर औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं आहे. त्यासोबतच उस्मानाबादचे धाराशीव झाले आहे. राज्य सरकारने दिलेल्या प्रस्तावाला केंद्रीय गृहमंत्रालयाने २४ फेब्रुवारी रोजी मंजूरी दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे या निर्णयाची माहिती दिली आहे.

बाळासाहेब ठाकरेंनी दिले होते संभाजीनगर नाव
मुंबई आणि ठाण्यात जम बसवल्यानंतर शहरी तोंडवळा असेलल्या शिवसेनेचा विस्तार करायचा असेल तर मुंबईबाहेर गेलं पाहिजे, हे बाळासाहेबांनी हेरलं. त्यांचा मोर्चा वळाला तो निजामी राजवटीच्या खुना अंगावर मिरवणाऱ्या औरंगाबादकडे. ५ जून १९८५ला औरंगाबादमधील मुख्य बाजारपेठ गुलमंडीत शिवसेनेची पहिली शाखा स्थापन झाली. मुंबई, ठाण्यात घुमणारी शिवसेनेच्या वाघाची डरकाळी औरंगाबाद आणि आसपासच्या गाव-खेड्यात घुमायला लागली. १९८५ ते १९९० या पाच वर्षांत मराठवाड्यातील गाव खेड्यात शिवसेनेच्या शाखा स्थापन होऊ लागल्या. भगवा रुमाल खांद्यावर घेतलेले शिवसैनिक आणि शिवसेनेचा भगवा झेंडा गावागावाच्या वेशीवर दिसायला लागला.
बाळासाहेब ठाकरेंची रोखठोक भाषा. हिंदूत्वाचा पूकारा. हा औरंगाबाद आणि एकूणच मराठवाड्यातील तरुणांना आकर्षित करु लागला. १९८८ साली औरंगाबाद महापालिका निवडणुकीनं शिवसेनेनं मराठवाड्यात राजकीय प्रवेश केला.

- Advertisement -

१९८८ साली बाळासाहेबांची औरंगाबादेत पहिली सभा झाली. मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर झालेली ही सभा ऐतिहासिक ठरली. ही बाळासाहेबांची मराठवाड्यातील पहिलीच सभा. याच सभेत बाळासाहेबांनी औरंगाबाद महापालिकेत सत्ता आल्यास औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याची गर्जना केली. पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेचे तब्बल २७ नगरसेवक तेव्हा निवडून आले. त्यानंतर कित्येक वर्षे औरंगाबाद महापालिका शिवसेनेच्याच ताब्यात राहिली आहे. मात्र औरंगाबादचे संभाजीनगर बाळासाहेबांच्या हयातीत झाले नाही. १९९५ मध्ये शिवसेना – भाजपचे राज्यात सरकार आले. तेव्हाही औरंगाबादच्या नामांतराचा प्रश्न बाळासाहेबांनी बाजूला ठेवला.

शेवटच्या कॅबिनेटमध्ये संभाजीनगरचा ठराव
बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे २०१९ मध्ये मुख्यमंत्री झाले. अडीच वर्षे ते राज्याचे मुख्यमंत्री राहिले. मात्र औरंगाबादचे नाव संभाजीनगर करु शकले नाही. महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात या शहराच्या नामांतराचा विषय नव्हता, असं काँग्रेसकडून वारंवार सांगितलं जात होतं. कदाचित त्यामुळेच ठाकरेंना अडीच वर्षांच्या काळात हा निर्णय घेता आला नाही. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शेवटच्या कॅबिनेटमध्ये उद्धव ठाकरेंनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव करण्याचा ठराव घेतला. मात्र त्यांच्याही कारकिर्दीत औरंगाबादचे संभाजीनगर होऊ शकले नाही. त्यानंतर सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने पहिल्याच कॅबिनेटमध्ये ठाकरेंचा निर्णय फिरवला आणि संभाजीनगरला पुढे छत्रपती जोडले. शिंदे फडणवीस सरकारने औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव करण्याचा ठराव घेतला. या ठरावाला २४ फेब्रुवारीला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला मंजूरी दिली आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विट करुन हि माहिती दिली.

- Advertisement -

शिंदे-फडणवीस सरकारने अखेर औरंगाबादचे नामांतर करुन दाखवले आहे. याचा त्यांना आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत फायदा होतो का, हे पाहावे लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -