मुंबई : मध्य रेल्वेच्या मळवली ते लोणावळा स्थानकांदरम्यान आज सोमवारी (ता. 02 डिसेंबर) दुपारच्या सुमारास ब्लॉक घेण्यात आला. हा ब्लॉक दुपारी 1.30 वाजता ते 4.15 वाजेपर्यंत घेण्यात आला होता. मात्र हा ब्लॉक अचानक घेण्यात आल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. परिणामी, मुंबईच्या दिशेने येणाऱ्या काही गाड्यांना विलंब झाला आहे.
मळवली आणि लोणावळा या दोन स्थानकांदरम्यान अचानक घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे गाडी क्रमांक 20801 आणि गाडी क्रमांक 09420 मधील प्रवाशांना ताटकळत बसावे लागले. तर मळवली आणि लोणावळा स्थानकादरम्यान घेण्यात आलेला ब्लॉक हा अगदीच ऐनवेळी घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी हा ब्लॉक घेतल्याचे सांगितले. (Central Railway News Plight of passengers coming from Pune to Mumbai due to sudden railway block)
याबाबत मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांनी माहिती देत सांगितले की, मळवली ते लोणावळ्यादरम्यान दुपारी 1.30 वाजेपासून सायंकाळी 4.15 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे पुण्याहून मुंबईच्या लोणावळ्याच्या दिशेने येणाऱ्या दोन गाड्यांना आधीच्या स्टेशनवर थांबविण्यात म्हणजेच रेग्युलेट करून ठेवण्यात आले, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
महत्त्वाची बाब म्हणजे, मध्य रेल्वेकडून घेण्यात येणाऱ्या ब्लॉकची माहिती नेहमीच प्रसिद्धी पत्रकांद्वारे देण्यात येत असते. त्यामुळे प्रवासी मध्य रेल्वेवर जवळचा किंवा लांबचा प्रवास करताना त्याबाबत पहिला विचार करून मग घराबाहेर पडतात. पण जर का रेल्वेकडून अचानक ब्लॉक घेण्यात आला तर याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. असेच काहीसे आता आठवड्याच्या सुरुवातीलाच घडले असून पुण्याहून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसला आहे.
हेही वाचा… Mumbai Crime : महिला ठरली डिजिटल अरेस्टचा बळी, बसला लाखोंचा फटका; नेमकं प्रकरण काय?
पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी गाडी क्रमांक 09420 पुणे स्थानकात 10.45 वाजता अपेक्षित होती. मात्र, मध्य रेल्वेने अचानक घेतलेल्या ब्लॉकमुळे ही गाडी सुरुवातीला 11.15 वाजता, त्यानंतर 11.30 वाजता, त्यानंतर 11.45, 12.00 आणि 12.30 वाजता येणार अशी अनाउंसमेंट करण्यात आली. ज्यानंतर मोठ्या प्रतीक्षेनंतर ही गाडी 12.45 वाजता आली. परंतु, गाडी आल्यानंतर स्थानकावरून निघताच पुणे स्थानकापासून काही किलोमीटर अंतरावर 1.20 वाजल्यापासून थांबून राहिली. ती 03 वाजून 35 मिनिटांनी निघाली. त्यानंतर पुन्हा 10 मिनिटांच्या प्रवासानंतर ही गाडी पुन्हा थांबविण्यात आली व काही मिनिटांमध्ये मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली. परंतु, रेल्वे विभागाकडून कोणतीही उद्घोषणा न करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला, अशी माहिती यावेळी पुण्याहून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशाकडून देण्यात आली.