तनुजा शिंदे । नाशिक
शहरात गौरी – गणपतींच्या (Gauri Ganpati festival) आगमनाची लगबग सुरु झाली आहे. तरी शहरातील मुख्य बाजापेठांमध्ये गौरायांसाठी साज, साड्या, दागिने, खाद्यपदार्थ, सजावटीच्या वस्तुंच्या खरेदीसाठी महिलांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ दिसत आहे. पण प्रत्येक सणात काहीतरी विशेष ट्रेंड फॉलो केला जातो.
तसाच ट्रेंड यावेळी गौरींच्या उत्सवातही दिसत आहे. यावेळी गौरींचा “बाईपण भारी देवा” (Baipan Bhari Deva movie) या चित्रपटातील “मंगळागौर” गाण्यातील अभिनेत्रींच्या लूकवरून प्रेरित साड्या तसेच दागिने बाजारात दाखल झाले आहेत. यात प्रामुख्याने ’ऑफ व्हाईट’ रंगाच्या पण हिरवा, जांभळा, गडद निळा, फिकट निळा, केशरी, लाल अशा विविध रंगाच्या शालूंचा पदर असलेल्या साड्या तसेच त्याच रंगांचे लक्ष्मीहार, बोरमाळ, मोत्यांचे साज अश्या दागिन्यांनाही महिलावर्गाकडून विशेष पसंती दर्शविली जात आहे.
केदार शिंदे यांच्या “बाईपण भारी देवा” या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. या सिनेमातील सर्वच गाणी सुपरहिट ठरली होती. अजूनही या गाण्यांची सोशल मीडियावर क्रेझ आहे. याच चित्रपटाच्या शेवटी असलेले ’ मंगळागौर ’ या गाण्यातील अभिनेत्रींचा लूक चर्चेचा विषय बनला होता. तर यावर्षी हाच लूक गौरींनाही देणार असल्याचे अनेक महिलांनी सांगितले. या गाण्यातील अभिनेत्रींचा लूक हा पात्रांच्या स्वभावाची संकल्पना ठेवण्यात आली होती. तसेच अभिनेत्रींच्या ब्लाऊजवरही आई, बहीण, बायको, मुलगी असे लिहिण्यात आले आहे. तसेच या पदरांच्या रंगांनुसार लक्ष्मी हार व कंठ हार बनवण्यात आले होते. तर ह्या लूकवरून प्रेरित होऊन ह्यावेळी बाजारात गौरींसाठी अनेक प्रकारचे दागिने, साड्या व सजावटीच्या वस्तूंना विशेष मागणी आहे.
पेशवाई थाटही कायम…
गौरींना सजविण्यासाठी यावेळी पेशवाई थीमलाही पसंती मिळत आहे. यात वेलवेटच्या पेशवाई नऊवारी साड्या, पेशवाई वेलवेटचा शेला, आणि पेशवाई दागिने यांनाही पसंती मिळत आहे. पेशवाई दागिन्यांमध्ये कोल्हापुरी साज, शिंदेशाही साज, अंबाडा, मोहनमाळ, वाकी, राणीहार, चिंचपेटी, शिंदेशाही तोडे इत्यादींना मागणी आहे.
यावर्षी “बाईपण भारी देवा” हा सिनेमा खूप गाजला होता. महिलांमध्ये अजूनही या सिनेमाचे आकर्षण आहे. म्हणूनच आम्ही त्या डिझाईन्सचे दागिने विक्रीसाठी आणले होते, आणि ह्या दागिन्यांना महिलांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. : दिव्या काळे, सजावटीच्या वस्तू व दागिन्यांचे व्यापारी