पाच दिवसांत राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

Chance of light to moderate rains in the state in five days

राज्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे उष्णतेपासून नागरिकांची सुटका झाली आहे. दरम्यान पुढील पाच दिवसात राज्याच्या विविध भागात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुढच्या 24 तासात कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

दक्षिण कोकणासह गोव्यात जोरदार पाऊस –

पुढच्या 24 तासात दक्षिण कोकणासह गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहण्याचा अंदाज असून घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही ठिकाणी विजाच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर विदर्भात काही ठिकाणी वारे वाहण्याची शक्यता आहे.

उर्वरित महाराष्ट्रात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज –

48 तासात मान्सून राज्यातील विविध भागात आगेकूच करण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शुक्रवारी तळकोकणात दाखल झालेल्या मान्सूनने रायगडसह पुण्यापर्यंतचा भाग व्यापला आहे. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. शविवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, मुंबई, कोल्हापूर या भागात जोरदार पाऊस झाला . मोसमी पाऊस दाखल झाल्याने कोकण आणि मुंबई परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. पुढील दोन दिवस कोकणात मुसळधार पावसाची शक्यता असून, उर्वरित सर्व महाराष्ट्रात पुढील पाच दिवसात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना दिलासा –

पावसाचे आगमन झाल्यामुळे शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे. पावसामुळे पेरणीपूर्व कामांना वेग आला आहे. पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी आनंदी आहेत. त्यामुळे आणखी चांगला पाऊस झाल्यास शेतकरी खरीपाची पेरणी करणार आहेत.