राज्यातील ‘या’ भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता

आत्तापर्यंत पावसाने मुंबई आणि उपनगरासह अहमदनगर, यवतमाळ, रायगड आणि औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस बऱ्यापैकी हजेरी लावत आहे. या पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून या भागात आता पेरणीच्या कामांना चांगला वेग आला आहे. मात्र राज्यातील काही भागांमध्ये पावसाचे आगमन अजून लांबवलेले आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी पावसाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. आत्तापर्यंत पावसाने मुंबई आणि उपनगरासह अहमदनगर, यवतमाळ, रायगड आणि औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे.

औरंगाबादमध्ये मुसळधार पाऊस


औरंगाबादमधील सिल्लोड तालुक्यातही बऱ्यापैकी पाऊस पडला आहे. तालुक्यातील नद्या दुधडी भरून वाहू लागल्या आहेत.

यवतमाळ जिल्ह्यातील पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांना दिलासा
मागील काही तासांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यात पावसाने चांगली हजेरी लावली. जवळपास एक तास पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पावसाच्या येण्याने शेतकऱ्यांच्या पेरणीची वाट मोकळी झाली आहे. कारण १०० मिलीमीटर पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नका, असे कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले होते. त्यामुळे शेतकरी पावसाच्या आगमनाची वाट पाहत होते, दरम्यान आता या भागात मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला सुरूवात केली आहे.

राज्यातील या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
हवामान विभागाच्या अंदाजानुसार २४ जून ते २७ जून या काळात रत्नागिरी जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तसेच दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा किनारा या ठिकाणी ४० ते ५० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याचा इशारा वर्तवण्यात आला आहे. तसेच मच्छिमारांना तसेच नागरिकांना या काळात समुद्रात जावू नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे.