आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठी देशातील सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. निवडणुकांआधी जातीय हिंसा घडवली जाऊ शकते, अशी भीती रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. ते माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. केंद्र सरकार आणि अजित पवार गटावरही त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे. (Chances of major violence ahead of Lok Sabha elections 2024 NCP leader Rohit Pawar expressed fear)
मी शरद पवारांसोबतच राहणार
ईडीची नोटीस तुम्हालाही आली का? असा प्रश्न विचारला असता, रोहित पवार म्हणाले की, नोटीस आली आहे किंवा नाही यावर मी बोलणार नाही. परंतु, ईडीची नोटीस मला येऊ शकते आणि कितीही नोटीस आल्या तरीही हा रोहित पवार महाराष्ट्रातील लोकांच्या बाजूने भूमिका घेत आहे आणि शरद पवार यांच्यासोबतच स्पष्टपणे आणि भक्कमपणे उभा आहे, असं म्हणत त्यांनी मी एकटा नाही तर हे सर्व पदाधिकारी त्यांच्या पाठिशी उभे असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
पवारसाहेब कधीही भूकंप करु शकतात
शरद पवार हे राजकीय भूकंपांसाठी ओळखले जातात. राजकीय खेळी करण्यात ते निष्णात आहेत. त्यामुळे अजित पवार जेव्हा भाजपसोबत गेले तेव्हा अनेकांना वाटलं की यामागे शरद पवारांचाच हात आहे. परंतु आता जसा जसा वेळ पुढे जात आहे. लोकांना ही पवार साहेबांची खेळी नसल्याचं समजतंय. तसंच शरद पवार हे वेळोवेळी आपली भूमिका स्पष्ट करत असतात. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आता संभ्रम नसल्याचं स्पष्टीकरण रोहित पवार यांनी दिलं.
केंद्राच्या निर्णयावर रोहित पवारांचा संताप
केंद्र सरकारच्या कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावण्याच्या निर्णयावर रोहित पवार यांनी टीका केली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्याला दोन रुपये मिळण्याची अपेक्षा असताना केंद्र सरकारने तत्काळ पावले उचलत 40% निर्यात शुल्क आकारण्याचा निर्णय घेऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला आहे. सरकारच्या या तुघलकी निर्णयामुळे कांद्याचे दर पडले तर केंद्र सरकार जबाबदारी घेईल का?, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
चार पाच महिन्यांपूर्वी जगभरात कांद्याची टंचाई असताना आपल्या देशात मात्र कांद्याला कवडीमोल भाव मिळत होता, शेतकरी कांद्याच्या शेतांवर रोटर फिरवत होते, तेव्हा निर्यात प्रोत्साहन अनुदान देऊन केंद्र सरकारने हस्तक्षेप केला नाही, तेव्हा शेतकऱ्याचे अश्रू सरकारला दिसले नाहीत आणि आज शेतकऱ्याला एक दोन रुपये मिळण्याची शक्यता आहे तर लगेच यांच्या डोळ्यात शेतकरी खुपायला लागले.
केंद्र सरकार तर निर्लज्ज आहेच, परंतु त्याहून अधिक निर्लज्ज राज्य सरकार आहे. आठवडाभरात कांदा अनुदान देऊ असं सांगणाऱ्या राज्य सरकारने पाच महिने निघून गेले तरी अनुदानाचा एक रुपया देखील शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्याची दानत दाखवली नाही. अशा शेतकरी विरोधी सरकारांचा जाहीर निषेध!, असा संताप रोहित पवारांनी व्यक्त केला.
( हेही वाचा: देशातील शांतता भंग करण्याचा भाजपचा डाव; शरद पवारांचा घणाघात )