Homeमहाराष्ट्रChandrabhaga River : चंद्रभागेची दयनीय अवस्था, भाविकांनी व्यक्त केला संताप

Chandrabhaga River : चंद्रभागेची दयनीय अवस्था, भाविकांनी व्यक्त केला संताप

Subscribe

पंढरपूर : विठ्ठलाचे दर्शन आणि चंद्रभागेत स्नान हे प्रत्येक वारकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. चंद्रभागेत स्नान केले नाही तर विठ्ठलाचे दर्शनच झाले नाही, असे वारकऱ्याला वाटते. पण आता या चंद्रभागेची अत्यंत दयनीय अशी अवस्था झाली आहे. ज्या चंद्रभागेत लाखो वारकरी स्नान करायला येतात, त्या चंद्रभागेत अस्वच्छता पसरली आहे. चंद्रभागेचे पाणी हे गटारीतील पाण्यासारथे दिसू लागले आहे. तर चंद्रभागेचा आजूबाजूचा परिसर म्हणजे ज्याला वाळवंट म्हटले जाते ते उकिरडा बनले आहे. दुषित चंद्रभागा पाहून अनेक भाविकांनी संताप व्यक्त केला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी ‘नमामि चंद्रभागा’ या प्रकल्पाची घोषणा केली होती. परंतु, आता मात्र ही योजना केवळ कागदावरच राहिली असल्याचे पाहायला मिळत आहे. (Chandrabhaga river has become unclean, devotees express their anger)

हेही वाचा… Gyanvapi Case: 30 वर्षांनंतर व्यास तळघरात पूजेला परवानगी, जाणून घ्या ‘ज्ञानवापी’ची संपूर्ण कहाणी

चंद्रभागा नदीची झालेली अवस्था पाहता येथे येणाऱ्या भाविकांनी, वारकऱ्यांनी याबाबत मनस्ताप व्यक्त केला आहे. चंद्रभागेची सफाई करण्यासाठी मंदिर समिती आणि पंढरपूर नगरपालिका खर्च करते, अशी माहिती अनेकदा समोर आली आहे. मात्र, असे काहीही होत नसून गेल्या काही महिन्यांपासून वारकऱ्यांच्या नशीबात दुर्गंधी असलेल्या पाण्यात स्नान करणे आणि घाणीने भरलेल्या वाळवंटात भजन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे देखील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे मात्र, चंद्रभागेच्या परिसरात आधीच वाळू माफियांकडून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करण्यात येत असल्याने आता ते वाळवंट देखील उजाड होऊ लागले आहे. ज्यामुळे आता चंद्रभागा नदीची आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसराची अत्यंत दयनीय अवस्था होऊ लागलेली असताना प्रशासनाकडून अद्यापही यांकडे गांभीर्याने लक्ष देण्यात येत नसल्याची तक्रार भाविकांकडून, नागरिकांकडून करण्यात येत आहे.

विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणारे लाखो भाविक पहिल्यांदा चंद्रभागेचे पवित्र स्नान करून तिचे तीर्थ तोंडात घेतात आणि मग विठुरायाच्या दर्शनाला जातात. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून चंद्रभागेची अत्यंत वाईट अवस्था झाल्याने वारकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहेत. याच घाण पाण्यात स्नान करावे लागते आणि तेच घाण पाणी तोंडात घ्यावे लागत असल्याने विठ्ठल भक्त निराश होत आहेत. चंद्रभागा अर्थात भीमा नदीच्या काठावर साधारण 120 गावे आहेत ज्याचे सांडपाणी नदीत मिसळते. या नदीकाठच्या काठावरील गावातील सांडपाणी नदीत मिसळू नये, यासाठी या 120 गावात स्वच्छ भारतमिशन योजनेतून शोष खड्डे , सांड पाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन ही कामे ‘नमामि चंद्रभागा’ प्रकल्पाअंतर्गत हाती घेण्यात आली होती, मात्र, ही योजना आजही शासनाच्या कागदावर धूळखात पडली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, माणसाच्या मृत्यूनंतर होणारे दशक्रिया विधी चंद्रभागेच्या तिरी करण्यात येतात. यासाठी देशभरातील मयताचे नातेवाईक इथे मोठी गर्दी करतात. दशक्रिया विधी नंतर केस, ब्लेडची पाने, कपडे तसेच पिंडदान केलेले भाताचे गोळे असेच उघड्यावरती वाळवंटात पडलेले दिसतात. मृतांच्या अस्थी, कपडे , वस्तू चंद्रभागेत सोडून दिले जात असल्याने चंद्रभागा अजून प्रदूषित होत आहे. चंद्रभागेत दशक्रिया विधी करण्याची भावना असली तरी यासाठी वेगळी व्यवस्था करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. मात्र याकडे प्रशासन डोळेझाक करीत असल्याने भाविक संतप्त आहेत.