उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नसल्याने फिल्डवर असलेले फडणवीसच जनतेला मुख्यमंत्री वाटतात – चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil and Devendra Fadnavis
उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नसल्याने फिल्डवर असलेले फडणवीसच जनतेला मुख्यमंत्री वाटतात - चंद्रकांत पाटील

मला आजही मीच मुख्यमंत्री आहे असं वाटतं, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नसल्याने फिल्डवर असलेले देवेंद्र फडणवीसच जनतेला मुख्यमंत्री वाटतात, असं म्हणाले. उद्धव ठाकरेंकडून जनतेला अपेक्षा नाही आहेत, अशी टीका देखील चंद्रकांत पाटील यांनी केली. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

“देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. त्यांच्या म्हणण्याचा असा अर्थ आहे की आजही जनता मी मुख्यमंत्री असल्या सारखीच अपेक्षा करते. जे त्यांना मराठवाड्याच्या प्रवासात जाणवलं. गावागावात तुम्ही मुख्यमंत्री असयाला हवे होते, असं लोकांनी म्हटलं. त्यावरुन त्यांना असं वाटतं की, लोकांमध्ये गेल्यावर असं वाटतं की आजही मी मुख्यमंत्री आहे. कारण उद्धव ठाकरेंकडून अपेक्षा नाही आहे. ते बाहेर पडणार नाहीत हे त्यांनी गृहीत धरलं आहे. प्रत्येकवेळी जीवाचा आकंत करुन देवेंद्र फडणवीस रस्त्यावर आहेत. त्यामुळे लोकांना आजही फडणवीसच मुख्यमंत्री वाटतात,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

‘मला आजही मीच मुख्यमंत्री आहे असं वाटतं’ – देवेंद्र फडणवीस

नवी मुंबई येथे महिला मासळी विक्रेता परवाना वितरण समारंभात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्यासारखे नेते माझ्या पाठिशी असल्यामुळे मला एकही दिवस जाणवलं नाही की मुख्यमंत्री नाही. मला असं वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मनुष्य कुठल्या पदावर आहे हे महत्त्वाचं नाही, तो काय करतो हे महत्त्वाचं आहे. गेले दोन वर्ष एकही दिवस घरात न थांबता जनतेच्या सेवेमध्ये आहे. त्यामुळे मला जनतेने देखील हे जाणवू दिलं नाही की मी आता मुख्यमंत्री नाही आहे. विरोधी पक्षनेता म्हणून काम करतोय. ज्या दिवशी आशीर्वाद मिळेल त्या दिवशी पहिल्यांदा गोवर्धिनी मातेकडेच मी येणार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी नवी मुंबईत पुन्हा आम्हीच निवडून येऊ आणि आम्ही पुन्हा एकदा सेवा करू, असा विश्वासही व्यक्त केला.


हेही वाचा – भाजपची ऑफर न स्वीकारण्याइतके शरद पवार कच्च्या गुरुचे चेले नाहीत – चंद्रकांत पाटील

 ‘मला आजही मीच मुख्यमंत्री आहे असं वाटतं’ – देवेंद्र फडणवीस