ईव्हीएम मशीनबाबत चंद्रकांत खैरेंचा भाजपवर गंभीर आरोप

ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी ईव्हीएम मशीनबाबत बोलताना भाजपवर गंभीर आरोप केला आहे. ईव्हीएम मशीन भाजपकडून सॅटेलाईटद्वारे नियंत्रीत केल्या जातात, असा आरोप खैरेंनी केला आहे.

Chandrakant Khair makes serious allegations against BJP regarding EVM machines

ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा राज्यभर शिवगर्जना अभियानाला सुरुवात झाली आहे. या शिवगर्जना अभियानाच्या अंतर्गत ठाकरे गटाचे प्रमुख नेते राज्यातील विविध भागात जाऊन मेळावे घेत आहेत. कोलमडलेल्या ठाकरे गटाला मजबूत करणे आणि पक्षाला नवी उभारी देण्याचे काम ज्येष्ठ नेत्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, छत्रपती संभाजी नगरचे माजी खासदार आणि ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी शिवगर्जना यात्रेदरम्यान गडचिरोली येथे हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे.

यावेळी बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, “ईव्हीएम मशीन नको, बॅलेट पेपर हवा अशी मागणी आम्ही आधीपासूनच करत आलो आहोत. अमित शाह मोठमोठ्या घोषणा करतात. महाराष्ट्रात ४८ जागा जिंकू, बिहारमध्ये ३६ जागा जिंकू असं ते कोणत्या मुद्द्यावरुन सांगतात. आता जनता ते मान्य करणार नाही. हे सगळं सॅटेलाईटद्वारे नियंत्रित केलं जात आहे. त्यामुळे आम्हाला ईव्हीएम मशीन नको. आम्हाला बॅलेट पेपर हवा आहे.”

“महाराष्ट्राची जनता त्रस्त आहे. शिवसेना फोडण्याचं नीच काम मिंधे गटानं केलं आहे. फडणवीसांनी त्यांना स्ट्राँग केलंय. विकासाचं काम नाही. नोकऱ्या नाही. महागाई वाढली. एवढं असतानाही मिंधे गटाला स्ट्राँग केलं जाते. हेच सांगायला मी इथं आलो आहे.” असे यावेळी खैरे म्हणाले आहेत.

दरम्यान, चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या या गंभीर आरोपानंतर आता भाजपकडून काय प्रत्युत्तर देण्यात येणार आहे? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. आजवर अनेक नेत्यांनी भाजपवर ईव्हीएम मशीनबाबत आरोप केले आहेत. पण खैरे यांनी थेट आरोप केल्याने याचे राजकारणात नेमके काय पडसाद उमटतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा – मनीष सिसोदियांना ठोठावली पाच दिवसांची सीबीआय कोठडी

निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर राजकारणात मोठा भूकंप झाला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाकडून एक याचिका सुप्रीम कोर्टात देखील दाखल करण्यात आली आहे. परंतु ठाकरे गटाबाबत घडणाऱ्या सर्व गोष्टींना भाजपचं सर्वस्वी जबाबदार असल्याचा आरोप कायमच ठाकरे गटाच्या नेत्यांकडून करण्यात आलेला आहे.