पोटनिवडणुकीसाठी भाजपची रणनीती काय?, चंद्रकांत पाटलांनी दिली माहिती

chandrakant patil

कसबा आणि पिंपरी-चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे पिंपरी-चिंचवड आणि कसबा विधानसभेच्या या दोन जागा रिकाम्या झाल्या आहेत. या जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. दोन्ही आमदार हे भारतीय जनता पक्षाचे होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीलाच भाजपकडून संधी देण्याची तयारी सुरू असल्याचे संकेत आज पुण्याचे पालकमंत्री आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.

चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, स्वर्गीय नेते लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. त्या पोटनिवडणुकीच्या पूर्वतयारीला मी येथे आलो होतो. लक्ष्मण जगताप हे आमदार नसून ते आम्हा सर्वांचे नेते होते. ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातल्या माणसांचा आधार होते.

दिल्लीतून उमेदवारी जाहीर होईल

27 फेब्रुवारीला मतदान होणार होते. मात्र मतदानाचा टक्का वाढवा यासाठी 26 फेब्रुवारीचे नॉटिफिकेशन आयोगाने जाहीर केले आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असा सर्वांचा प्रयत्न आहे. परंतु वेळेवर उमेदवार दिल्यास गाफील न राहता तयारीसाठी आजची बैठक घेण्यात आली आहे. उमेदवार ठरण्याची प्रक्रिया आज झाली नाही. भाजपची उमेदवार ठरवण्याची पद्धत वेगळी आहे. यामध्ये इच्छुकांची नावं प्रदेशाकडे जातात. प्रदेशाची एक कोअर कमिटी आहे, तर एक पार्लमेंटरी बोर्ड आहे. कोअर कमिटी आणि पार्लमेंटरी बोर्डाकडून ही नावं केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाकडे जातात. त्यानंतर निर्णय दिल्लीतून घोषीत होतो. त्यामुळे दिल्लीतून उमेदवारी जाहीर होईल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

तीन प्रमुख पाहणार निवडणुकीचं काम

या बैठकीत आम्ही तीन प्रमुख घोषित केले. या पोटनिवडणुकींच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक प्रमुखपदी शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांना नियुक्त केलं आहे. चिंचवड मंडळाचे सरचिटणीस त्यांना मदत करणार आहेत. त्यानंतर दुसरी समिती व्यवस्थात्मक आहे. याचा प्रमुख माजी नगरसेवक बापू काटे यांना केलं आहे. यांना सभागृहाचे माजी सभागृह नेते नामदेव ढाके हे त्यांना सहाय्यक असतील. तिसरी समिती इतर पक्षांशी चर्चा करणारी आहे. याच्या प्रमुखपदी शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्याकडे तर कसबा आणि चिंचवड या दोन्ही पोट निवडणुकांचे प्रमुख राज्य सरचिटणीस मुरलीधर मोहोळ असतील. अशा प्रकारे कामाची विभागणी करण्यात आल्याचं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.


हेही वाचा : कसबा, पिंपरीतील पोटनिवडणुकीबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; म्हणाले – बिनविरोध…